श्रीवर्धन बसस्थानकात बेकायदा पार्किंग
श्रीवर्धन बसस्थानकात बेकायदा पार्किंग
बस वाहतुकीला अडथळा; ‘पे अॅण्ड पार्किंग’ सुविधा सुरू करण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. ८ (वार्ताहर) : श्रीवर्धन बसस्थानकात बेकायदा पार्किंगमुळे प्रवाशांसह चालकांचा मनस्ताप वाढला आहे. बस स्थानकात खासगी वाहनांसह दुचाकी मोठ्या प्रमाणात पार्क केल्या जात असल्याने बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एसटी स्थानक प्रशासनाकडून यावर तोडगा काढण्यात यावा. तसेच स्थानकात ‘पे अॅण्ड पार्किंग’ सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशीवर्गासह वाहनचालकांकडून केली जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यातून दररोज नोकरी, शिक्षण तसेच विविध कामानिमित्त तालुक्याबाहेर प्रवास करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे. म्हसळा, माणगाव, गोरेगाव, महाड आदी ठिकाणी नोकरी अथवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे अनेक प्रवासी दररोज श्रीवर्धन बसस्थानकातून प्रवास करतात. मात्र बसस्थानकाच्या आवारात दुचाकी उभ्या करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व नियोजित सुविधा नसल्याने त्या कुठेही पार्क केल्या जातात. शिवाय नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेली गाडीदेखील अनेकदा फलाटाच्या जवळच उभ्या केल्या जातात. परिणामी स्थानकातून ये-जा करणाऱ्या बसगाड्यांना या बेकायदा वाहनांचा मोठ्या प्रमाणात अडथळा होतो. विशेषतः सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर लावण्यात येतात. अशावेळी ग्रामीण भागातील फेऱ्यांच्या बसेस फलाटालगत किंवा मोकळ्या जागेत उभ्या कराव्या लागतात. अशा वेळी अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकींमुळे त्यांना योग्य ठिकाणी उभे राहता येत नाही. याचा फटका ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना बसत असून, त्यांना बस शोधण्यासाठी स्थानकात भटकावे लागते. वयोवृद्ध, महिला तसेच विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होत असून, बस वेळापत्रकही विस्कळीत होते. याशिवाय अपघाताचा धोकादेखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन बसस्थानकात दुचाकींसाठी स्वतंत्र ‘पे अॅण्ड पार्किंग’ सुविधा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. नियोजित पार्किंग व्यवस्था झाल्यास नोकरदार व विद्यार्थी आपली वाहने सुरक्षित ठेवू शकतील, तसेच बसस्थानकातील वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
...................
प्रशासन सकारात्मक
या संदर्भात श्रीवर्धन आगार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. श्रीवर्धन बसस्थानकाच्या आवारात ‘पे अॅण्ड पार्किंग’ सुविधा प्रस्तावित आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग व विद्यार्थी आपली दुचाकी सुरक्षित ठेवू शकतील. त्याचबरोबर बसस्थानकातील गोंधळ कमी होऊन प्रवाशांना होणारा त्रासही टळेल, अशी माहिती श्रीवर्धन आगार प्रमुख महिबूब मणेर यांनी दिली आहे. प्रवासी वर्गाने या सुविधेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी केली असून, आगार प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

