नागरी समस्यांचे आगार

नागरी समस्यांचे आगार

Published on

प्रभाग क्रमांक १३

नागरी समस्यांचे आगार

अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्यांचा सुळसुळाट

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : राज्याचे वनमंत्री, आमदार, खासदार, महापौर आणि लोकप्रतिनिधींचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोनकोडे खैरणे गावातील विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक १३मध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनधिकृत बांधकामे, उखडलेले रस्ते, कचऱ्याची समस्या, पार्किंगला न मिळणारी जागा, फेरीवाल्यांचा वाढता उच्छाद असे प्रश्न हजारो नागरिकांना भेडसावत आहेत.

प्रभाग क्रमांक १३मध्ये बोनकोडे खैरणे गावात वेगवेगळ्या पाच समाजांचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. सिडको आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. या प्रभागात बोनकोडे गाव, खैरणे गाव, कोपरखैरणे सेक्टर ९ ते १३ चा समावेश आहे. या ठिकाणी सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील वसाहतीसोबत उच्चभू वसाहती या ठिकाणी उभ्या आहेत. सोबतच अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगची समस्या गंभीर होत चालली आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि २६ हजार ७९८ मतदार असलेल्या या प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले, तरीही समस्या कायम आहेत.

बोनकोडे आणि खैरणे गाव, नोड आणि सेक्टरमध्ये बाजारासाठी स्वतंत्र संकुलाची गरज आहे. ही सुविधा नसल्याने सध्या पदपथांवर बाजार भरतात. गावातील रस्त्यांवर फेरीवाले विक्रीसाठी बसलेले असतात. त्यांच्यामुळे सकाळ-संध्याकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अन्य ठिकाणी आठवडा बाजार भरतो, पण या ठिकाणी भरणारा दररोज बाजार भरतो. हा प्रभाग मध्यमवर्गीयांच्या वस्तीचा आहे. त्यामुळे तरुणांसाठी व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वाचनालय सुविधांची गरज आहे. समाजमंदिर, मुलांना खेळासाठी हक्काचे मैदानदेखील नाही. तसेच अभ्यासासाठी अभ्यासिकादेखील नाही.

अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
या विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांनी इमारती बांधल्या आहेत. या बांधकामांमुळे पाणी, सांडपाणी, त्याची वाहिनी यासारख्या प्राथमिक सुविधांवर ताण येतो. त्यामुळे अनधिकृत बांधकामे थांबवण्याची गरज आहे. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक बांधकामे बोनकोडे व खैरणेमध्ये उभी राहिली आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये बोनकोडे गावातील चार माळ्यांची इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. सुदैवाने एक दिवस आधी नागरिकांनी स्थलांतर केल्याने मोठी जीवितहानी टळली होती.

रस्त्याकडेला वाहने
या प्रभागात रस्त्यावरील वाहतूक पार्किंग ही मुख्य समस्या आहे. गावामध्ये पार्किंगसाठी जागाच नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केले जात आहेत. त्यामुळे चालकांना मार्ग काढताना नाकीनऊ येतात. हीच समस्या सिडको वसाहतीमध्येही आहे.

कचराकुंड्या ओव्हरफ्लो
प्रत्येक गल्लीत कचरा पाहायला मिळतो. कचराकुंड्या असल्या तरी त्या लोकसंख्येच्या मानाने कमी पडत आहेत. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, गावात उघडी गटारे आहेत. त्यामुळे उंदीर-घुशींचा त्रास आहे. गावात पाणी साचलेले असल्याने त्यात मच्छरांचा उपद्रव वाढतो. अनेकदा गटारांमध्ये कचरा अडकून बसतो आणि दुर्गंधी वाढते.

वाहन पार्किंगची समस्या
मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याने पाच ते सहा माळ्यांच्या इमारती दिमाखात उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. सेक्टर १२ मधील नागरी आरोग्य केंद्रामागील इमारतीवर पाच वर्षांपूर्वी पालिकेने तोडक कारवाई केली होती. त्यानंतर त्या इमारतीचा राडारोडा आजही पडून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com