बदलापूर एमआयडीसीत स्फोटांची मालिका

बदलापूर एमआयडीसीत स्फोटांची मालिका
Published on

बदलापूर एमआयडीसीत स्फोटांची मालिका
नोटिसा देऊनही कारवाई शून्य, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ८ : बदलापूर पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील पॅसिफिक ऑर्‍गॅनिक केमिकल कंपनीत बुधवारी (ता. ७) सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटांनी संपूर्ण शहर हादरले आहे. ही आग तब्बल नऊ तास धगधगत होती. वारंवार होणारे स्फोट आणि आगीच्या घटनांनंतरही प्रशासनाकडून केवळ नोटिसांचा खेळ सुरू असल्याने बदलापूरकर आता ‘जिवंत बॉम्ब’च्या सावटाखाली जगत असल्याचा आरोप होत आहे.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीतील केमिकल रिॲक्टरमध्ये पहिला स्फोट झाला. त्यानंतर स्फोटांची मालिकाच सुरू झाली, ज्याचे आवाज चार-पाच किलोमीटरपर्यंत ऐकू येत होते. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून पहाटे चार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही घटना सायंकाळी घडल्याने दिवसा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असला तरी कंपनी पूर्णपणे राख झाली आहे.

प्रशासकीय निष्क्रियतेचा फटका
पॅसिफिक ऑर्‍गॅनिकसह नोव्हा ओलिओ आणि इस्टर या कंपन्यांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. फॅक्टरी इन्स्पेक्टर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने यापूर्वी नोटिसा दिल्या होत्या; मात्र ठोस कारवाई झाली नाही. कंपनीपासून अवघ्या ५०० मीटरवर मोठी गृहसंकुले आहेत. स्फोटानंतर पसरलेल्या विषारी धुरामुळे रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला.

प्रदूषणाचाही विळखा
केवळ आगीच नव्हे, तर एमआयडीसीतील इतर कंपन्यांच्या भोंगळ कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समाजसेवक युवराज गीध यांनी आरोप केला, की एमआयडीसीतील काही कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडत आहेत. त्यामुळे फॅक्टरीज ॲक्ट १९४८ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६अंतर्गत कारवाईचे अधिकार असतानाही प्रशासन गप्प का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

बदलापूरकरांचे प्रश्न
वारंवार स्फोट होऊनही कंपनीचे परवाने रद्द का झाले नाहीत, रहिवासी क्षेत्राजवळ अशा घातक कंपन्यांना परवानगी कशी, हवेत पसरलेल्या विषारी धुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीला जबाबदार कोण, असे अनेक सवाल केले जात आहेत. तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कंपन्यांचा नफेखोरपणा यामुळे बदलापूरकरांचा जीव टांगणीला लागला आहे. ही आग नसून प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश आहे, अशीही टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com