मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलाखत
मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंन सवाल
मुंबई, ता. ८ : तुम्ही इतकी वर्षे मुंबईतील मराठी माणसांसाठी काय केले याचे उत्तर द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावले आहे. मुंबईच्या विकासाची सुरुवात नागपूरकर गडकरींमुळेच झाली. आम्ही मुंबईत जन्माला आलो नाही हा आमचा दोष नाही; मात्र तुम्ही मुंबईत जन्माला येऊन या शहरासाठी, येथील लाेकांसाठी काय केले, ते सांगा, असा टाेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लगावला. मुख्यमंत्री नागपूरचे असून, मुंबईचे प्रश्न, अडचणी समजण्यासाठी मुंबईत जन्माला यावे लागते, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
‘सकाळ माध्यम समूहा’ला गुरुवारी विशेष मुलाखतीत मुख्य संपादक नीलेश खरे यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी राजकीय, विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेताेड उत्तरे दिली. ‘देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्माला यायचे, हे त्यांच्या हाती नव्हते; मात्र गुजरातमध्ये जन्मलेल्या मोदी यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश माहीत आहे. त्यांच्या इतका देश कुणालाच माहिती नाही. समजा, मुंबई मला कळत नाही. तुम्हाला कळते. मग इतकी वर्षे तुम्ही काय केले? मुंबईतील मराठी माणसाला मुंबई सोडून दूरच्या ठिकाणी घर घ्यावे लागले. २५ वर्षे मुंबईत सत्ता होती, तुम्ही काय केले?’ असा सवाल त्यांनी केला. ‘नागपूरच्या गडकरींनी मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधले, वरळी-वांद्रे सी-लिंक बांधला अन् मुंबईच्या विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे अन् पुन्हा माझ्या मुख्मंत्रीपदाच्या काळात मुंबईच्या विकासाला सुरुवात झाली. मुंबईत जन्मलेल्यांनी पहिल्यांदा तुम्ही सत्तेत असताना काय केले, त्याचे उत्तर द्यावे,’ असेही त्यांनी सुनावले.
ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई
एक लक्षात घेतले पाहिजे की ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही. त्याचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा मराठी माणूस आहे. अटकेपार झेंडा फडकवणारा हा मराठी माणूस आहे. त्याच्यात एवढी क्षमता आहे की या ठिकाणी त्याचेच अस्तित्व राहील. ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना असे वाटते की, आपण जिंकलो नाही तर आपल्या पक्षाचे अस्तित्व संपेल. ते म्हणजे मराठी आणि ते म्हणजे महाराष्ट्र नाही. मुंबईसह महाराष्ट्रात खूप मराठी माणसे राहतात हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.
---
‘त्यांचे’ कार्यकर्ते माेठे झाले नाहीत!
उद्धव ठाकरे असा आरोप करतात की, तुम्ही आमचा पक्ष फोडून आमची माणसे तीकडे नेतात. तुमच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे की ते मोठे होण्यापेक्षा तुम्हीच मोठे होत आहात. तुमची प्रतिष्ठाच मोठी होत आहे. त्यामुळे तुमच्या कामावर तुमच्या वागण्यावर निराश होऊन काही कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. तसेच येणारे कार्यकर्तेही जुने हिंदुत्ववादी कार्यकर्तेच आहेत.
मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला?
मराठी माणसांच्या आकांक्षा-अपेक्षा असतात. दक्षिण मुंबईतला मराठी माणूस हा अटकेपार का गेला? कारण त्यांच्यासाठी आपण काहीच केले नाही. बीडीडी चाळीचा प्रश्न घ्या. जिथे हजारो मराठी माणसे राहतात, त्यांचा प्रश्न किती दिवस रखडलेला आहे, त्याकडे तुम्ही लक्ष का दिले नाही. केवळ बिल्डरलाच शोधण्यात वेळ घालवला. त्यावर मी ही चाळ म्हाडाच विकसित करेल, असा निर्णय घेतला. त्याचे टेंडर काढले, काम सुरू केले आणि इमारतीही तयार झाल्या. घरांच्या चाव्या दिल्या. अभ्युदयनगर, पत्रा चाळीचेही तेच झाले. पत्रा चाळीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून लोक राहत होते. त्या लोकांना रत्यावर आणण्याचे काम त्यांनी केले तर आम्ही त्यांना हक्काची घरे दिली. त्यामुळे मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे तुम्ही काय केले, हे सांगितले पाहिजे.
राज ठाकरे ठाम नसतात...
राज ठाकरेंबद्दल मी एकच सांगेन की त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात. त्यांना कोणी चालवत नाही. अनेक वेळा ते त्यांच्या निर्णयावर ठाम नसतात. त्यांनी मधे सांगितले की त्यांना हिंदुत्वावर काम करायचे आहे तेव्हा त्यांनी हिंदुत्वासाठी काम केले. त्यानंतरदेखील त्यांनी हिंदुत्व बाजूला ठेवून मराठीचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभा विधानसभा सोडली तर ते आमच्या विरोधातच होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

