सूर्या पाणी योजना व मेट्रो नरेंद्र मेहतांमुळे रखडली
सूर्या पाणी योजना, मेट्रो मेहतांमुळे रखडली
परिवहनमंत्री सरनाईक यांचे पुन्हा एकदा टीकास्त्र
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सुरू असलेल्या वादात सरनाईक यांनी पुन्हा एकदा मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मिरा भाईंदरची सूर्या धरण पाणी योजना आणि मेट्रो नरेंद्र मेहता यांच्या कंपनीमुळेच दोन वर्षे रखडल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
दरम्यान, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आरोप खरे असते तर प्रताप सरनाईक दोन वर्षे गप्प का बसले? निवडणुका आहेत म्हणून जाणूनबुजून ते हे आरोप करीत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असा खुलासा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
मिरा-भईंदरमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सूर्या धरण पाणी योजना सुरू आहे. दहिसरपर्यंत येणारी मेट्रो मिरा-भाईंदर शहरातही येत आहे. या दोन्ही योजनांचा आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देऊन सहकार्य केले. म्हणून दोन्ही योजना पूर्णत्वाला येत आहेत.
जमीन देण्यास नकार
या दोन्ही प्रकल्पांना आवश्यक असलेली जमीन देण्यास भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इल्व्हेन कंपनीने नकार दिला होता. त्यामुळे प्रकल्प दोन वर्षे रखडले. याची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी मेहता यांना कडक शब्दांत समज दिल्यानंतर मेट्रोचे काम सुरू झाले. मेहता यांना आमदार झाल्यावरच या योजना कार्यान्वित करून त्याचे श्रेय घ्यायचे होते. म्हणूनच या प्रकल्पांना दोन वर्षे उशीर झाला, असा आरोप सरनाईक यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचे परिवहनमंत्र्यांकडून स्वागत
मिरा-भाईंदरमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. ९) मिरा रोड येथे येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता बाळासाहेब ठाकरे मैदानात त्यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मिरा-भाईंदरमधील आगमनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वागत करणारे फलक प्रताप सरनाईक यांच्याकडून लावण्यात येत आहेत. मिरा-भाईंदरमध्ये भाजप व शिवसेनेत युती झालेली नाही. असे असताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे फलक सरनाईक लावत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत. मंत्रिमंडळातील त्यांचा एक सहकारी म्हणून आपण त्यांचे शहरात स्वागत करणारे फलक लावले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले. या खेळीद्वारे आपण भाजप विरोधात नसून, स्थानिक पातळीवर केवळ भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना आपला विरोध असल्याचे मतदारांवर ठसविण्याचा प्रयत्न सरनाईक करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

