कस्तुरबा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे जेवण बंद
कस्तुरबा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे जेवण बंद
नाश्त्याविना परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची अडचण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेने रुग्णालयांमधील अंतर्गत स्वयंपाकघर व्यवस्था बंद करून खासगी कॅटरर्समार्फत ‘थाळी प्रणाली’ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालयातील परिचारिकांसह कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. नव्या वर्षापासून या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना सकाळचा व सायंकाळचा नाश्ताही मिळेनासा झाल्याने सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिकेने शहर व उपनगरांतील दहा रुग्णालयांमधील स्वयंपाकघर बंद करून रुग्णांसाठी बाहेरून तयार केलेले जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंत्राट देण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या अंतर्गत कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालयासह सावित्रीबाई फुले भगवती रुग्णालय, दिवंगत मेहता रुग्णालय, पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, एस.बी.डी. सावरकर रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आदी ठिकाणी सुमारे १,६०० रुग्णांना खासगी केटरिंग सेवेद्वारे जेवण दिले जाणार आहे; मात्र या निर्णयामुळे रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी उपलब्ध असलेली नाश्ता व जेवणाची सोय बंद झाली आहे. या निर्णयाला महापालिका कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संघटनांचे म्हणणे आहे, की ‘इन-हाउस स्वयंपाकघर बंद करून सेवा खासगी हातात देणे हे केवळ कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेलाच नव्हे, तर रुग्णसेवेच्या दर्जालाही धोका निर्माण करणारे आहे. युनियनचे संयुक्त सचिव प्रदीप नाईक यांनी सांगितले, की ‘महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अंतर्गत स्वयंपाकघर व्यवस्थाच प्रभावी ठरते. बाह्य कॅटरिंगवर अवलंबून राहिल्यास स्वच्छता, वेळेवर पुरवठा आणि दर्जा याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.’ दरम्यान रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची मूलभूत गरज असलेली नाश्ता-जेवणाची सोय मात्र बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा देणारेच कर्मचारी उपाशीपोटी काम करीत असल्याची स्थिती निर्माण झाली असून, यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
३०१ कोटींचा करार
महापालिकेने या केटरिंग व्यवस्थेसाठी सुमारे ३०१ कोटी रुपयांहून अधिकचा करार केला असून, यामध्ये एकूण १,७२८ फूड युनिट्सचा समावेश आहे. एका रुग्णाच्या एका दिवसाच्या आहारासाठी प्रती युनिट १७४.६० पैसे इतका दर निश्चित करण्यात आला आहे. या कराराचा कालावधी ११ महिने असून, त्यात मुदतवाढीची तरतूद आहे. या अंतर्गत रुग्णांना सकाळी नाश्ता, दुपारी बिस्किटे तसेच दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, मीठमुक्त आहार आणि विशेष आरटी फीडसारखे आहारही उपलब्ध करून देण्याची अट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

