गायमुख घाटावर अकरा वाहनांचा अपघात

गायमुख घाटावर अकरा वाहनांचा अपघात

Published on

गायमुख घाटात ११ वाहनांचा अपघात
चार जण जखमी; वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त

ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. अरुंद, तीव्र उतार आणि धोक्याची वळणे असलेल्या या घाटात पुण्यातील नवले पूल अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकते, असा धोका ‘सकाळ’ने व्यक्त केला होता. तो शुक्रवारी (ता. ९) खरा ठरला. घाटात झालेल्या अपघातात ११ वाहनांचे प्रचंड नुकसान होऊन दोन महिला, दोन पुरुष जखमी झाले आहेत. हा घाट सार्वजनिक बांधकाम खाते आणि वनविभागाच्या अटी नियमांमध्ये अडकल्याने घाटाचे काम रखडले आहे. परिणामी, या ठिकाणी वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे.
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जातो. एमएमआरडीएने बांधलेला हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या घाटात शुक्रवारी सकाळी ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर मोठा अपघात झाला. या अपघातात तसरीन शेख (वय ४५, रा. राबोडी), अनिता पेरवाल (४५, रा. मानपाडा), रामबली बाबूलाल (२२, रा. गोरेगाव) आणि शिवकुमार यादव (५६, रा. काशीमिरा) हे चौघे जखमी झाले. सकाळी मल्टी एक्सल ट्रक गायमुख घाटावरून ठाण्याकडे येत होता. अवजड ट्रक उतरणीला आला असता त्याचा मार्गाने विरुद्ध दिशेने इतर हलकी वाहने भाईंदरच्या दिशेने चालली होती. घाटावरील रस्ता अरुंद असल्याने घाटावरून खाली उतरत असलेल्या अवजड ट्रकसमोर अचानक विरुद्ध दिशेने वाहने आली. त्यामुळे ट्रकचालकाला वाहन थांबवणे शक्य झाले नाही. ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना धडका मारत पुढे गेला. काही क्षणात ट्रकने ११ गाड्यांना धडक दिली. या धडकेत रिक्षा, चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला. ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी चार जण जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांना अपघाताची बातमी समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून वडवली येथील रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

वाहतूक कोंडी
घोडबंदर-ठाणे मार्गावर अपघातग्रस्त वाहने उलटसुलट उभी होती. तर काही वाहने दुसऱ्या बाजूलादेखील फेकली गेली होती. त्यामुळे सकाळच्या वेळेत दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ठाणे-भाईंदर मार्गावरील अपघात दुरुस्त वाहने बाजूला केल्याने हा मार्ग तासाभरातच वाहतुकीसाठी मोकळा झाला; मात्र ठाणे वाहिनीवर अपघातग्रस्त वाहनांची संख्या जास्त असल्याने ती बाजूला काढण्यास विलंब झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी वर्सोवा चौकापर्यंत झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले.
़़़़़़़़़़़़़़़़
घाटावर धोकादायक वळणे आणि उतार असल्याने तो वाहतुकीला धोकादायक झाला आहे. ‘सकाळ’ने हे वृत्त वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com