प्रियांका दामले उपनगराध्यक्षपदी बिनविरोध
बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी दामले बिनविरोध
शिवसेना शिंदे गट विरोधकाची भूमिका बजावणार
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियांका दामले यांची बिनविरोध निवड झाली. पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी ही प्रक्रिया पार पडली.
नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. भाजप-राष्ट्रवादी एकत्रित गटाकडे २६ सदस्यसंख्या असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका दामले यांचे नाव जाहीर करण्यात आले. या वेळी शिवसेना शिंदे गटाकडून अॅड. संदेश ढमढेरे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे प्रियांका दामले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सर्वांना सोबत घेऊन काम
पदभार स्वीकारताना दामले यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानत शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी त्यांना अधिकृत पदभार सोपवला. नव्या जबाबदारीसह बदलापूर पालिकेत महिलाराज आले असून, आता शहरातील महिलांच्या समस्यांना प्रामुख्याने प्राधान्य देणार असल्याचे या वेळी प्रियांका दामले यांनी सांगितले.
स्वीकृत सदस्य निवडीत वादंग
उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर एकूण ४९ नगरसेवक आणि नगराध्यक्ष मिळून ५० या संख्येनुसार पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. या वेळी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीने आपल्या २६ सदस्यांच्या संख्येच्या आधारे तीन स्वीकृत सदस्यांची मागणी केली. मात्र १० सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य या सूत्राचा दाखला देत शिवसेना शिंदे गटाने या मागणीला विरोध केला. या मुद्द्यावरून दोन्ही गटांतील नगरसेवकांमध्ये जोरदार वादंग झाला. यावर भाजपचे नगरसेवक राजेंद्र घोरपडे व संभाजी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पत्र दाखवत दावा करणाऱ्या गटांच्या तुलनेत ज्या गटाकडे सदस्यसंख्या जास्त आहे त्याला अधिक स्वीकृत सदस्य मिळू शकतात, असे स्पष्ट केले. अखेर भाजप-राष्ट्रवादी युतीचे तीन व शिवसेना शिंदे गटाचे दोन असे पाच स्वीकृत सदस्य निवडण्यात आले.
अखेर तीन-दोनचा तोडगा
या वेळी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक हेमंत चतुरे व आगरी सेनेचे शहराध्यक्ष अरुण बैकर, तर भाजप-राष्ट्रवादी युतीकडून आदर्श विद्यामंदिर शाळेच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष तुषार आपटे, समाजसेवक शागोफ गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

