नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्रे

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्रे

Published on

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्रे
‘जीएनएम’, ‘एएनएम’च्या पडताळणीसाठीचा वेळ होणार कमी

मुंबई, ता. ९ : राज्यातील शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी नर्सिंग विद्यालयांतून जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (जीएनएम) आणि ॲक्सिलिटरी नर्सिंग मिडवाइफरी (एएनएम) हे नर्सिंग डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका (मार्कशीट) आणि डिप्लोमा प्रमाणपत्रे ब्लॉकचेनआधारित डिजिटल प्रणालीद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली असून, यामुळे नोकरीसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणारा वेळ आणि अडथळे दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २०१८मध्ये स्वायत्त संस्था म्हणून स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय व खासगी संस्थांनी एएनएम व जीएनएम नर्सिंग डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यातून नर्सिंग क्षेत्रात देशात व परदेशात मोठी मागणी असल्याने राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून राज्याबाहेर व परदेशात नोकरीसाठी जातात; मात्र प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित नोकरीच्या संस्थांकडून मंडळाकडे प्रमाणपत्रे पाठवली जात असल्याने या प्रक्रियेस मोठा कालावधी लागत होता. परिणामी काही विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेत ‘ब्लॉकचेन’आधारित डिजिटल प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या प्रबंधक वैशाली राऊत यांनी दिली.


या विद्यार्थ्यांना होणार लाभ
नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका व डिप्लोमा प्रमाणपत्रांचा थेट लाभ मिळणार आहे. आतापर्यंत या प्रणालीद्वारे २३,९४८ गुणपत्रिका, १८,१७५ उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि ३५,६७१ डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

प्रश्नपत्रिकाही ऑनलाइन
राज्यातील सुमारे १,४०० शासकीय, निमशासकीय व खासगी एएनएम व जीएनएम नर्सिंग डिप्लोमा विद्यालयांमध्ये दरवर्षी सुमारे ८० हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतात. राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ पाहता परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचविणे ही मोठी कसरत ठरत होती. यासोबतच काही अनुचित प्रकार लक्षात आल्याने मंडळाने ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com