कल्याण-डोंबिवलीत पार्किंगचा तिढा

कल्याण-डोंबिवलीत पार्किंगचा तिढा

Published on

कल्याण-डोंबिवलीत पार्किंगचा तिढा
प्रशासकीय उदासीनतेचा फटका; बंद वाहनतळांमुळे नागरिक हैराण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण-डोंबिवली शहरांचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. परिणामी, खासगी वाहनांचा वापर वाढला असून पार्किंगचा प्रश्न आता शहराच्या नियोजनातील मोठे अपयश ठरत आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात दरवर्षी ७५ ते ८० हजार नव्या वाहनांची भर पडत असताना, पार्किंगच्या सुविधांबाबत मात्र प्रशासन ढिम्म असल्याचे चित्र आहे.

शहरातील बहुतांश जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. नव्या गृहसंकुलांमध्ये पार्किंग बंधनकारक असले तरी, एका कुटुंबातील वाहनांची संख्या वाढल्याने तिथेही जागा अपुरी पडत आहे. यामुळे अंतर्गत रस्ते आणि मोकळ्या जागांवर वाहनांचा गराडा पाहायला मिळतो.

कोट्यवधींचे प्रकल्प धूळखात
प्रशासकीय उदासीनतेचा सर्वात मोठा फटका सार्वजनिक वाहनतळांना बसला आहे. मालमत्ता कराच्या वादामुळे दिलीप कपोते वाहनतळ (कल्याण) पूर्ण क्षमतेने सुरू नाही. पाटकर प्लाझा व सुनीलनगर येथील वाहनतळ सध्या बंद अवस्थेत आहेत. रेल्वेची पार्किंग स्थळे आणि खासगी सुविधा उपलब्ध असल्या तरी, त्यांचे अवाढव्य शुल्क आणि मर्यादित जागा यामुळे नागरिक रस्त्यावरच पार्किंग करणे पसंत करतात.

विनामूल्य पार्किंगचा मोह आणि वाहतूक कोंडी
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलिस ठाण्यासमोर अधिकृत पार्किंग असूनही, केवळ शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण रस्त्यावर वाहने उभी करतात. यात वकील, पोलिस आणि डॉक्टरांच्या वाहनांचाही समावेश असतो. वाहतूक पोलिस शाखेच्या नाकाखालीच हे बेशिस्त पार्किंग होत असल्याने पोलिस ठाणे परिसरात सकाळ-संध्याकाळ प्रचंड कोंडी होते.

या परिसरांना विळखा
कल्याण : प्रेम ऑटो ते केडीएमसी बस आगार, स्थानक ते गुरुदेव हॉटेल, महंमद अली चौक ते शिवाजी चौक, वसंत व्हॅली ते मुंबई विद्यापीठ रोड
डोंबिवली : मानपाडा रोड, चार रस्ता, पाटकर शाळा रोड, नेहरू रोड आणि सावरकर रोड

चोरीची भीती
रस्त्यावर उभी केलेली वाहने असुरक्षित असल्याने वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कामावर गेलेले नागरिक दिवसभर आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असतात. पार्किंगच्या शोधामुळे वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि मानसिक तणाव अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दिलीप कपोते वाहनतळासह बंद असलेले इतर प्रकल्प तातडीने सुरू करावेत. तसेच शहरात नवीन बहुमजली पार्किंग व्यवस्था उभी करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा प्रश्न भविष्यात अधिक उग्र रूप धारण करेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com