उमेदवार बदलल्यामुळे प्रचारात भाजपचा गोंधळ

उमेदवार बदलल्यामुळे प्रचारात भाजपचा गोंधळ

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वाशी येथे प्रभाग क्रमांक १७ मधून बाद झालेल्या भाजपचे उमेदवार ॲड. नीलेश भोजने यांना पुन्हा लढण्याची संधी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा दावा मान्य करीत त्यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केलेली कारवाई अमान्य केली. परंतु या दरम्यान भाजपने अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना पाठिंबा जाहीर करीत प्रचार सुरू झाल्याने गोंधळ उडाला आहे.

वाशी सेक्टर १७ ‘अ’मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने नीलेश भोजने यांना उमेदवारी दिली होती, मात्र अर्जाच्या छाननी वेळेस भोजने यांच्या वडिलांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची नोटीस शपथपत्रात न दाखवल्याची हरकत पाटकर यांच्या बाजूने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे घेण्यात आली होती. या हरकतीवर निवडणूक अधिकाऱ्याने भोजने यांनी माहिती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवून त्यांचा अर्ज बाद केला होता. याविरोधात भोजने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेने दिलेली नोटीस ही वडिलांना असून, आपल्या नावावर आल्याचे भोजने यांनी न्यायालयाला सांगितले.

निवडणुकीत आपले पॅनेल एका जागेने रिक्त राहू नये, म्हणून भाजपने याच प्रभागातील अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना भाजप पुरस्कृत म्हणून जाहीर केले. तसेच त्यांना मिळालेल्या ‘बॅट’ या चिन्हाचा प्रचारही सर्वत्र सुरू केला. मात्र भोजने यांच्या याचिकेवर न्यायालयाने पहिल्या सुनावणीवेळी गुरुवारी (ता. ८) स्थगिती आदेश दिले. शुक्रवारी (ता. ९) अंतिम सुनावणीवेळी भोजने यांनी केलेला दावा मान्य करीत त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. या काळात भाजपच्या नवी मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे भोजने यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे.

मतदारांमध्ये संभ्रम
अवघ्या तीन दिवसांमध्ये भोजने यांना मतदारांपुढे पोहोचण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने थेट दुसऱ्या उमेदवाराच्या नावाचे फलक आणि बॅनरबाजी केल्यामुळे मतदारांमध्ये भाजपपुरस्कृत उमेदवाराची जनजागृती केली आहे. तसेच एकाच प्रभागात भाजपचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

माझे वडील सी. डी. भोजने यांनी केलेल्या बांधकामाबाबत मला अनधिकृत बांधकामाची नोटीस आली होती. यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयाने मला पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा मी राहिलेल्या दिवसांत भाजपचा प्रचार करणार आहे.
- ॲड. नीलेश भोजने, भाजप उमेदवार, प्रभाग क्र. १७ अ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com