नवी मुंबईत काळा प्रचार

नवी मुंबईत काळा प्रचार
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरल्यामुळे नवी मुंबईमध्ये प्रचार टोकाला पोहोचला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी सानपाडा परिसरात चक्क काळी जादू आणि करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवाराला नामोहरम करण्यासाठी मतांमागे वाटल्या जाणाऱ्या पैशाची रक्कम वाढवण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी शिवसेना व भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर महाविकास आघाडीतही बिघाडी होऊन शिवसेना हे मनसेसोबत, तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट हे काँग्रेससोबत लढत आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचार बंद होणार आहे. मंगळवारी (ता. १३) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. या दोन दिवसांत जास्तीत जास्त मतदारांच्या घरोघरी पोहोचता यावे, याकरिता राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे; परंतु यादरम्यान सानपाडा सेक्टर पाच येथील प्रभाग क्रमांक १९च्या शरद पवार गटाच्या उमेदवार ॲड. डिम्पल ठाकूर यांच्या प्रभागात करणी व काळी जादू करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शुक्रवारी (ता. ९) रात्रीच्या वेळेस प्रचार संपल्यानंतर पक्षाच्या कार्यालयाशेजारी एका ठिकाणी कोपऱ्यात दोन ताटांमध्ये जेवण आणि काही साहित्य ठेवल्याचे निदर्शनास आले. कार्यकर्त्यांनी ही बाब उमेदवाराचे पती रूपेश ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांना धक्का बसला. प्रगत शहरातदेखील अशा प्रकारे आजही लोक अंधश्रद्धा बाळगून समोरील उमेदवारावर जादूटोण्यासारखे प्रकार करीत असल्याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तर दुसरीकडे बेलापूर आणि ऐरोली या मतदारसंघात भाजपविरोधात शिवसेना शिंदे गटाचा कलगीतुरा रंगला आहे.

विरोधक उमेदवारांना पाडण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदारांना रोजची जेवणावळ आणि पार्टी झडत आहेत. आता एवढे करूनही मतदारांना नोटांचे दर्शन घडवण्यासाठी वेगवेगळ्या किमतीच्या स्पर्धाच लागल्या आहेत. वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि तुर्भे परिसरात मताला आठ ते नऊ हजारापर्यंतचा दर घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. याला कोणी दुजारा देत नसला तरी मतांमागे नोटांची किंमत वाढत असल्याने शहरातील वातावरण गढूळ होऊन गेले आहे. अशा परिस्थितीत गरीब उमेदवाराकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या
वनमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ठिकठिकाणी होणाऱ्या कॉर्नर सभांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका होत आहे. ईडीच्या धाडी पडण्यावरून नाईकांनी शिंदेंवर शाब्दीक हल्ला चढवला आहे, तर आपण शांत आहोत, तोपर्यंत ठीक आहे; परंतु जेव्हा संयम सुटला, तर सर्व काही नाहिसे करू, असा इशारा नाईकांनी विविध माध्यमांसोबत बोलताना दिला आहे. यावर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनीही सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांच्यावर कोणीही बलात्काराचा गुन्हा दाखल केला नसून ते दारोदारी जामीन मिळवण्यासाठी धावत नव्हते, असा टोला जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी लगावला आहे. शिंदे यांनी कळवा-बेलापूर बँक लुटली नाही, म्हणून त्यांना ईडीच्या कारवाईची भीती नाही, असे पाटकर यांनी नाईकांचे नाव न घेता टीका केली.

प्रचाराचा ‘सुपर संडे’
१५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याआधी १३ जानेवारीला संध्याकाळी प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करण्यासाठी (ता. ११) शेवटचा रविवार मिळणार आहे. रविवारी नागरिकांना सुट्टी असल्यामुळे मतदारांना घरी भेटण्यासाठी घरभेटींवर उमेदवारांचा भर असणार आहे. हा रविवार प्रचारासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com