अपक्षांनी फोडला दिग्गजांना घाम

अपक्षांनी फोडला दिग्गजांना घाम

Published on

अपक्षांनी फोडला दिग्गजांना घाम
प्रचारात रंगत, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे पालिका निवडणूक मतदानाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. अवघ्या चार दिवसांवर मतदान असून, प्रचाराचा धुरळा जोरात उधळत आहे. सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना विरोधी पक्षातील उमेदवार जोरदार टक्कर देत असल्याचे चित्र असताना या रणांगणात उतरलेले अपक्ष उमेदवारही थेट दिग्गजांना घाम फोडत असल्याचे दिसत आहे. घरोघरी भेटींचा सपाटा, रॅलीचा धडाका आणि त्यातून आरोपांच्या फैरी झाडत आव्हान देत आहेत. त्यामुळे यंदा सत्ताधाऱ्याच्या विजयाचे गणित अपक्ष बिघडवण्याची शक्यता आहे.

ठाणे पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये तब्बल १४१ अपक्ष उमेदवार उतरले होते. त्यापैकी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत ५५ अपक्ष खेळपट्टीतून बाहेर गेले. तरीही ८६ अपक्ष उमेदवारांचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. यामध्ये डझनभर बंडखोर उमेदवारही आहेत. त्यापैकी काहींना पक्षांचा छुपा तर काही ठिकाणी उघड पाठिंबा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे उमेदवारही यामध्ये आहेत. त्यामुळे ऐन प्रचार रंगात आला असताना विशेषत: सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. यामध्ये शिंदे गटाला सर्वाधिक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा थेट सामना करावा लागणार आहे. त्यातून काही प्रभागांमध्ये खटके उडत असून, थेट दादागिरीची भाषाही वापरण्यात येत आहे. तर भाजपच्या विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवारांना शिवसेना शिंदे गटाचे छुपे समर्थन मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या काही जागा धोक्यात आल्याचे चित्र आहे.

प्रभाग १ मध्ये शिंदे गटाला डोकेदुखी
गेल्या निवडणुकीत संपूर्ण चार पॅनेल शिवसेनेने जिंकले होते; मात्र आता युती झाल्याने शिवसेना शिंदे गटाने आपली हक्काची एक जागा भाजपला दिली आहे. येथील निवडणूक ही घरत दाम्पत्याभोवती फिरत असल्याचे दिसते. नम्रता घरत या मागील वेळी ब पॅनेलमधून निवडून आल्या होत्या. त्यांना शिंदे गटाने पुन्हा संधी देत पॅनेल क मधून उमेदवारी दिली आहे. पण त्यांचे पती रवि घरत अपक्ष उमेदवार म्हणून पॅनेल ‘ड’मधून शिंदे गटाचे उमेदवार सिद्धार्थ ओवळेकर यांना थेट आव्हान देत आहेत. स्थानिक म्हणून ओळख असलेले रवि घरत यांनी वातावरण ढवळून काढले आहे. ‘आपलाच माणूस’ हा मुद्दा पुढे करीत ते थेट मैदानात उतरले असून सिद्धार्थ ओवळेकर यांच्याविरोधात लढत रंगली आहे.

प्रभाग क्रमांक २मध्ये उत्सुकता
पॅनेल डच्या हिरानंदानी इस्टेटमधील सक्रिय कार्यकर्ते प्रवीण नागरे यांनी प्रचारात अक्षरशः रान उठवल्याचे दिसते. भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याविरोधात नागरे यांनी सोसायटी संपर्क, तरुण मतदार आणि थेट संवादावर भर दिला आहे. उच्चभ्रूंचा समजला जाणारा हा प्रभाग भाजपचा गड मानला जातो. पण येथे काँग्रेसची ६०० मते निर्णायक असून येथे कोण कुणाला मागे टाकतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

प्रभाग क्रमांक ३मध्ये राजकीय आखाडा
यंदाच्या निवडणुकीत मनोरमानगर हा प्रभाग हॉट स्पॉट ठरला आहे. शिंदे गटाच्या महिला आघाडीप्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे राजीनामा नाट्य खूप गाजले. आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून घेण्यात त्यांना यश आले. पण त्यासाठी दोन माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. आता ते दोन माजी नगरसेवकच फेस आणत असल्याचे दिसत आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पॅनेलसमोर शिवसेनेच्याच बंडखोर अपक्ष उमेदवारांनी थेट आव्हान उभे केले आहे. माजी नगरसेवक भूषण भोईर आणि मधुकर पावशे हे दोघेही अपक्ष म्हणून लढत असल्याने मतांची विभागणी अटळ मानली जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समुदायाचा रोष ओढवून घेतल्याची चर्चा असून, मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रभाग आता शेवटच्या क्षणापर्यंत धोक्याचा मानला जात आहे.

प्रभाग क्रमांक ४मध्ये हायटेक प्रचार
उमेदवारी नाकारल्यामुळे शिंदे गटाचे बंडखोर नितीन लांडगे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाच्या सिद्धार्थ पांडे यांच्याविरोधात त्यांनी थेट शड्डू ठोकल्याचे चित्र आहे. यासाठी त्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला असून, प्रचारात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचे धाडस करताना दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी आक्रमक प्रचार सुरू आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्याला धमकवताना सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांची चित्रफीत समाजमाध्यावर तुफान व्हायरल झाली होती.

प्रभाग क्रमांक ८मध्ये घराणेशाही
८ हा प्रभाग भोईर कुटुंबाला शिवसेना शिंदे गटाने आंदण दिला आहे. एकाच घरातील चार उमेदवार चारही पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. यामध्ये पॅनेल क मधून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांच्या विरोधात माजी नगरसेवक लॉरन्स डिसोझा अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. माजिवडा गाव आणि लोढा परिसरात स्थानिक उमेदवार नसल्याची भावना व्यक्त होत असून, एकाच घरात चार तिकिटे दिल्याची चर्चा मतदारांमध्ये नाराजी वाढवत आहे.

समीकरण बिघडणार
प्रभाग क्रमांक १५ मध्ये १५ अपक्ष चारही पॅनेलमध्ये आहेत. येथे भाजपचे तीन तर शिंदे गटाचा एक उमेदवार आहे. विशेष म्हणजे हे सर्व अपक्ष भाजप उमेदवाराविरोधात आहेत. भाजपला त्यांच्या हक्काच्या प्रभाग २१ मध्येही असाच धक्का मिळाला आहे. शिंदे गटाचे बंडखोर किरण नाकती अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवार सुनेश जोशी यांना टक्कर देत आहेत. दरम्यान, नाकती यांना शिंदे सेनेच्या काही शिलेदारांचा उघड पाठिंबा मिळत असल्याने येथील निवडणूक चुरशीची बनली आहे.

जोरदार टक्कर
प्रभाग क्रमांक २२मध्ये अपक्ष विकास दाभाडे विरुद्ध शिंदे गटाचे माजी नगरसेवक पवन कदम अशी थेट लढत आहे. दाभाडे यांना मागील वेळी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा त्यांनी पूर्ण ताकद लावली असून कदम यांना घाम फोडला असल्याचे दिसते.

आघाडीचा पाठिंबा
प्रभाग क्रमांक २३मध्ये माजी नगरसेविका प्रमिला केणी यांचा कळवा भागात ठोस जनाधार आहे. असे असूनही शिंदे गटातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. ही संधी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा देत स्वगृही परतण्याचे दरवाजे उघडून दिले आहेत. दुसरीकडे वागळे आणि इतर प्रभागांतील बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनाही मनसे, शिवसेना ठाकरे गटाने आपलेसे केले असून, त्यांच्या प्रचारात सहभाग दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com