केडीएमसीतील चुरशीच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष.....
स्वकीयच विरोधक
कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत बंडाळी आणि पक्षांतराचे ग्रहण
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, जागावाटप आणि उमेदवारीवरून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महायुतीतील शिंदे गट आणि भाजपच्या अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मनसे किंवा ठाकरे गटाची मशाल हाती धरली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत स्वकीय विरुद्ध परकीय असा सामना रंगणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतींकडे लागले आहे.
महापालिकेच्या एकूण १२२ पैकी २० जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १०२ जागांसाठी आता प्रत्यक्ष रणसंग्राम होणार आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत एकत्र असलेले मित्र आता एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख प्रभागांतील काही पॅनेलमधील लढती अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनल्या आहेत.
पॅनेल २५ (धात्रक कुटुंब विरुद्ध भाजप)
भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला. आता शैलेश धात्रक, पत्नी मनीषा आणि मुलगी पूजा असे तिघेही रिंगणात असून, त्यांच्याविरोधात भाजपने समीर चिटणीस आणि नंदू म्हात्रे यांना उतरवून आव्हान दिले आहे.
पॅनेल २२
भाजपचे प्रकाश भोईर यांच्यासमोर मनसेचे संदेश पाटील यांचे आव्हान आहे. शिंदे गटाला ही जागा न सुटल्याने नाराज संदेश पाटील यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवली आहे.
पॅनेल २९
या पॅनेलमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर शिंदे गटाच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत. नितीन पाटील आणि रवि पाटील यांच्या गटाची भाजपच्या मंदार टावरे आणि अलका म्हात्रे यांच्याशी थेट लढत होईल.
पॅनेल ६ (कल्याण)
येथे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. शिंदे गटाचे संजय पाटील तर ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर आमनेसामने आहेत. त्यातच मनसेच्या तृप्ती भोईर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने ही लढत अधिक रंगतदार झाली आहे.
लक्षवेधी लढती आणि त्रिकोणी संघर्ष
पॅनेल प्रमुख उमेदवार पक्ष/गट विरोधात
पॅनेल २० शशिकांत कांबळे भाजप प्रमोद कांबळे (ठाकरे गट) व सुमीत कानकुटे (वंचित)
पॅनेल १२ (क) प्रमोद पिंगळे शिंदे गट शरद पाटील (ठाकरे गट) व विक्रांत शिंदे (अजित पवार)
पॅनेल ७ (क) हेमलता पवार भाजप गीतांजली पगार (अपक्ष बंडखोर)
पॅनेल ८ (क) वंदना गीध शिंदे गट कांचन कुलकर्णी (काँग्रेस)
बंडखोरीचे आव्हान
अनेक ठिकाणी पक्षाने आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने निष्ठावंतांनी अपक्ष अर्ज भरून दंड थोपटले आहेत. पॅनेल २०-‘ब’मध्ये भाजपच्या बंडखोर प्रमिला चौधरी या भाजपच्या अधिकृत उमेदवार शारदा चौधरी यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. तसेच पॅनेल ७-''अ’मध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये विजया पोटे विरुद्ध नयना भोईर थेट सामना होणार आहे. शिंदे गट, भाजप, ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांनी आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याने प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

