“वंदे मातरम् प्रत्येक भारतीयाचा श्वासोच्छ्वास” – डॉ. जयंत वसंत जोशी

“वंदे मातरम् प्रत्येक भारतीयाचा श्वासोच्छ्वास” – डॉ. जयंत वसंत जोशी

Published on

वंदे मातरम् प्रत्येक भारतीयाचा श्वासोच्छ्वास ः डॉ. जयंत वसंत जोशी
स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला डोंबिवलीत सुरवात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः वंदे मातरम् हे केवळ गीत नाही; तो ध्यास आहे, श्वास आहे, शपथ आहे, प्रेरणा आहे आणि गर्जना आहे. तो प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील देशप्रेम जागवणारा मंत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विज्ञान प्रचारक डॉ. जयंत जोशी यांनी डोंबिवलीमध्ये केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची शनिवारी (ता. १०) जयंत जोशी यांच्या ‘वंदे मातरम्’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानाने सुरुवात झाली. स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर जयंत जोशी, संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी उपस्थित होते.
जयंत जोशी यांनी आपल्या व्याख्यानात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील संदर्भ देत, वंदे मातरम् गीताच्या निर्मितीमागील ऐतिहासिक व भावनिक प्रवास उलगडून सांगितला. बंकिमचंद्र ब्रिटिशांकडे बंगाल प्रांतात मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत असताना परकीय सत्तेखाली नोकरी करावी लागते याची त्यांना खंत वाटत होती. भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाने अस्वस्थ होऊन त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एका मच्छीमाराने गंगा मातेसाठी मी आहुती देईन, असे उच्चारताना पाहिल्यावर त्यांच्या मनात देशासाठी बलिदानाची भावना अधिक प्रबळ झाली. नवरात्रोत्सवात दुर्गामातेचे दर्शन घेत असताना त्यांना दुर्गामाता म्हणजेच भारतमाता असल्याची अनुभूती आली आणि याच भावनेतून त्यांनी ‘हमारा दुर्गोत्सव’ हा लेख लिहिला. हाच लेख पुढे ‘वंदे मातरम्’ या गीताचे गद्यरूप ठरला, असे त्यांनी सांगितले.
वंदे मातरम् या गीतामध्ये संस्कृत व बंगाली भाषेचे सुरेख मिश्रण असून, भारताच्या समृद्धीचे, तेजाचे व मातृभूमीवरील प्रेमाचे दर्शन घडते. अनेक क्रांतिकारक वंदे मातरम् म्हणत फासावर गेले. देशाची एकता अबाधित राहावी म्हणून हे गीत प्रेरणास्थान ठरले. या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनाचा आपण नुकताच गौरवपूर्ण उत्सव साजरा केला, याची आठवणही त्यांनी करून दिली.
विपरीत परिस्थितीतही मार्ग दाखवणारी प्रेरणा म्हणजे वंदे मातरम्, असे सांगत त्यांनी भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले या काव्यपंक्तीचे उदाहरण दिले.

गणित प्रदर्शनाचे उद्‍घाटन
याचप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील पहिल्या नाविन्यपूर्ण मॅथ्स एक्सिबिशनचे उद्‍घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा व गणित प्रदर्शन प्रमुख डॉ. सरोज कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या सर्व स्वामी विवेकानंद शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील प्रत्येकी दहा प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. गणित प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्याचे उपस्थितांनी गौरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com