श्रीवर्धन येथे कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा
श्रीवर्धन येथे कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा
संक्रांतीच्या सुगडांचे उत्पादन घटले; कच्चा माल, मनुष्यबळ आणि खर्चाचा तिहेरी फटका
श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यातील कुंभार समाजाचा पारंपरिक मातीचा व्यवसाय सध्या विविध अडचणींमुळे संकटात सापडला आहे. या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. संक्रांतीच्या पारंपरिक सणासाठी बनवली जाणारी सुगडे, तसेच मडकी, कुंड्या, पणत्या, पाण्याचे माठ आणि शेगड्या यांचे उत्पादन यंदा लक्षणीयरीत्या घटले आहे. कुंभारवाड्यातील दहा ते बारा कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून असला, तरी सध्याच्या परिस्थितीत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुंभार व्यवसायाची प्रक्रिया अत्यंत कष्टाची आणि कौशल्यपूर्ण आहे. डोंगरावरून तांबडी माती आणून ती चाळली जाते, खडे वेगळे काढले जातात आणि पाण्यात भिजवून एकजीव केली जाते. त्यानंतर फिरत्या चाकावर हातांच्या व बोटांच्या साहाय्याने मातीला आकार देण्यात येतो. तयार झालेले सुगड व भांडी सुकवून भट्टीत भाजली जातात. भट्टीसाठी भाताची तुसे आणि लाकूड वापरले जाते, ज्यामुळे भाजलेल्या वस्तूंना तांबूस रंग व मजबुती मिळते. श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीत असलेला ‘तांबडीचा डोंगर’ काही अंशी कुंभार व्यावसायिकांसाठी राखीव आहे. कुंभार जातीचा दाखला असलेल्या व्यावसायिकांना नगरपरिषदेकडून अल्प दरात माती मिळते. मात्र, या परिसरात वाढती वस्ती झाल्याने मालवाहक वाहन नेणे कठीण बनले आहे. अरुंद व धोकादायक वाटांमुळे व्यावसायिकांना टप्याटप्याने, हाताने माती वाहून आणावी लागत आहे. मनुष्यबळाची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे ही अडचण आणखी तीव्र झाली आहे.
याशिवाय, तालुक्यात भातशेतीत झालेली घट, भात तुसाची कमतरता, वाढते तुसाचे दर, तरुण पिढीचा शहरांकडे ओढा आणि अवकाळी पावसाचे संकट, या सर्व कारणांमुळे कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकवणे कठीण होत आहे. शासनाने कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी सुलभ उपाययोजना, वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग आणि आर्थिक सहाय्य दिल्यास या पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकते, अशी अपेक्षा कुंभार समाजातून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

