ठाकरे बंधूसाठी मराठी रंगकर्मी मैदानात

ठाकरे बंधूसाठी मराठी रंगकर्मी मैदानात

Published on

ठाकरे बंधूंसाठी मराठी रंगकर्मी मैदानात
डिजिटल प्रचारातही कलाकारांची आघाडी

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे, प्रचारात मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक ठळक झाला आहे. ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्यामुळे मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवरचे कलाकार मोठ्या संख्येने निवडणूक प्रचारात एकवटल्याचे चित्र आहे.

मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही तर देशाचा ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून ओळखली जाणारे बॉलीवूडचे मुख्यालयही आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे पाळेमुळे या शहरात पसरले आहेत. राज ठाकरे व एकंदरीत ठाकरे घराण्याचा मराठी नाटक, कलाकारांशी जुने संबंध आहेत. त्यामुळे या वेळी प्रचाराच्या मैदानात मनसे-शिवसेनेच्या समर्थनार्थ अनेक मराठी सेलिब्रिटी, तारे-तारका मैदानात उतरले आहेत. पदयात्रा, कोपरा सभा, चाळीतील बैठका, वसाहतींमधील संवाद आणि छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून प्रचारात ते सहभागी होत आहेत. आदेश बांदेकर, तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, महेश मांजरेकर यांचा यामध्ये सहभाग आहे. मनसे चित्रपट सेनेशी जोडलेले सुमारे २५ हजार रंगकर्मी राज्यभरात कार्यरत आहेत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले, की हे सर्वजण मुंबईत जिथे राहतात, तिथे सक्रियपणे ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, नाट्यकर्मी आणि गायक अशा सर्व स्तरांतील कलाकार या वेळी मैदानात उतरले आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मुंबईतील मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. संवादशैली, नाट्य, कविता, पोवाडे आणि गीतांच्या माध्यमातून हे मुद्दे प्रभावीपणे मुंबईकरापर्यंत पोहोचवत आहेत.

डिजिटल प्रचारालाही वेग
महत्त्वाचे म्हणजे काही मराठी सेलिब्रिटी प्रचाराच्या मैदानात उतरले नसले तरी त्यांच्या एक्स अकाउंट आणि इतर समाजमाध्यमावरून ठाकरे बंधूंच्या उमेदवार, प्रचाराचे व्हिडिओ ते शेअर करत आहेत. निर्देशक महेश मांजरेकर यांनी संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली होती; दुसरीकडे ज्येष्ठ कलाकारांसह तरुण पिढीतील रंगकर्मी व्हिडिओ संदेश, थेट संवाद आणि लघू क्लिप्समधून मतदारांशी संवाद साधत आहेत.

सेलिब्रिटींमुळे मतदानाच्या पॅटर्नमध्ये फारसा परिणाम होत नाही; मात्र नवमतदार ज्यांची राजकीय समज शून्य आहे, त्यांच्यावर प्रभाव पडतो. दुसरे म्हणजे निवडणूक प्रचारात एक माहोल बनवण्यासाठी या कलाकारांचा वापर होतो.
- गिरीष वानखेडे, चित्रपट विश्लेषक

मुंबईची ओळख मराठी माणूस आणि मराठी कलाकारांनी घडवली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या हक्कासाठी आम्ही मैदानात आहोत. मनसे चित्रपट सेनेचे रंगकर्मी आपापल्या भागात सक्रियपणे प्रचार करत आहेत.
- अमेय खोपकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना


...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com