भाजपचे अमराठी नेते सायलेंट मोडवर
भाजपचे अमराठी नेते सायलेंट मोडवर
मुंबईतील प्रचारात भडक वक्तव्य टाळण्याकडे कल
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र आल्याचे सांगत ठाकरे बंधूंनी मराठी बाण्याचा सूर आळवला आहे. मुंबईतील निवडणुका मराठीच्या मुद्यावर लढवले जात असल्यामुळे भाजपचे उत्तर भारतीय अमराठी नेते सायलेंट मोडवर गेल्याचे चित्र आहे. या काळात अंगलट येणारी एकही कृती टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
ठाकरेंकडून मराठीचा अजेंडा रेटला जात असताना त्याला उत्तर भारतीय नेत्यांनी उत्तर दिल्यास थेट मराठी विरुद्ध अमराठी (उत्तर भारतीय) असे चित्र उभा राहू शकते. त्यामुळे मराठी माणूस दुरावण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजपचे उत्तर भारतीय नेते मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंग हे फारसे व्यक्त होताना दिसत नाही. एरवी कायम ‘एक्स’वर सक्रिय असणाऱ्या मोहित कंबोज यांनी निवडणुका लागल्यापासून एकही ट्विट किंवा विधान केले नाही. तर किरीट सोमय्या हे भांडुप तर लोढा हे दक्षिण मुंबईपुरते मर्यादित झाल्याचे दिसताहेत. शिवसेनेच्या मदतीने मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय असून यातील बहुतांश मतदार भाजपचा समर्थ मानला जातो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुका मराठी अस्मितेभोवती फिरत आहेत. त्यामुळे आधी हिंदू महापौैर बसवण्याची भाषा करणारा भाजप आता महापौर हा हिंदू मराठी म्हणू लागला आहे. अशा नाजूक वातावरणात एखाद्या अमराठी नेत्याने मराठीविरोधात काही वक्तव्य केले तर ते अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आपल्या व शिवसेनेच्या अमराठी नेत्यांना तूर्तास शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे दिसत आहे.
कृपा व अन्नामलाईचा उत्साह अंगाशी
भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकतेच मिरा-भाईंदर महापालिकेचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे सांगितले होते. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ते विधान मागे घेण्याची वेळ कृपाशंकर सिंह यांच्यावर आली, दुसरीकडे तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांच्या ‘मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर जगाची राजधानी आहे,’ या विधानावरून भाजपची अडचण झाली आहे.
मराठी माणूस दुरावण्याची भीती
भाजपने मुंबईत शिवसेनेच्या साहाय्याने मराठी मतांमध्ये फूट पाडून तसेच उत्तर भारतीय, गुजराती मतांच्या आधारावर पालिकेच्या सत्तेचे सोपान गाठण्याची रणनीती आखली आहे. या काळात एकही चूक न करता, ठाकरे बंधूंचा मराठी अस्मिता, मुंबईचा मुद्दा हाणून पाडण्याचे नियोजन पक्षाचे आहे. त्यामुळे भाजपने या वेळी मुंबईत केंद्रीय नेत्यांचा फौजफाटा, योगी आदित्यनाथ यांनाही मैदानात उतरवले नाही.
हे चेहरे गप्प
कृपाशंकर सिंह, मोहित कंबोज, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, राजहंस सिंह, अमरजित सिंह, नरेंद्र मेहता, संजय निरूपम (शिवसेना), जयप्रकाश ठाकूर, संजय उपाध्याय
...
सध्या मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय असे चित्र आहे. या परिस्थितीत अमराठी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सोबत असलेला मराठी मतदार दूर जाऊ नये, म्हणून भाजपने आपल्या बोलघेवड्या अमराठी नेत्यांना गप्प केले आहे. संजय निरूपम यांनाही शांत केल्याचे दिसत आहे.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक
मुंबईत भाजपचा चेहरा ‘मराठी’चा असून तेच बोलत आहेत. अमराठी चेहरे बोलताना दिसत नाही. ते अमराठी मतांची जमवाजमव करीत आहेत. हा भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकतो.
- अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

