अंबरनाथमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक

Published on

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : अंबरनाथ शहर अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात अडकले आहे. अपुरा, अनियमित, कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा ही समस्या आता नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. पाण्याच्या या सततच्या अडचणींमुळे सामान्य नागरिकांसह महिला वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांसह नागरिकांनी शनिवारी थेट मजीप्रा कार्यालयावर धडक दिली. मात्र, सुटीचा दिवस असल्याने एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त माजी नगरसेवकांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, सत्ता स्थापनेची घालमेल सुरू असतानाच शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील कोहोजगाव, कमलाकरनगर, नवरेनगर, उलनचाल, वांद्रेपाडा, सुभाषटेकडी, कैलासनगर, फुलेनगर, जावसई आदी भागांसह संपूर्ण शहर पाणीटंचाईने होरपळत आहे. अनेक ठिकाणी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर काही भागांत सलग दोन-दोन दिवस नळांना पाणीच नसते, अशी स्थिती आहे. काही परिसरांत रात्री अपरात्री पाणी सोडले जात असल्याने नागरिकांची झोप उडत आहे. वारंवार तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकारी वेळेवर पाणी सोडत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा रोषही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
काही महिलांना घरकाम व नोकरी यांचा समतोल साधता न आल्याने नोकरी सोडण्याची वेळही आली आहे. वारंवार तक्रारी, आंदोलने व मोर्चे काढूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निवडणुकांनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचे फोन नागरिकांच्या तक्रारींनी खणखणू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक उमेश पाटील, चरण पाटील व मिलिंद पाटील यांच्यासह नागरिकांनी शनिवारी थेट मजीप्रा कार्यालयावर धडक दिली. शहरातील पाणी प्रकल्प मार्गी लागायला अजून एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी करणार असल्याचे माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांचे आश्वासन
यावेळी अधिकाऱ्यांनी बदलापूर परिसरात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर पाणीवाहिन्यांना गळती झाल्याने सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी नगरसेवक चरण पाटील यांनी दिली. मात्र, हा त्रास आजचा नसून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अंबरनाथ शहर पाणीटंचाईने त्रस्त असल्याचा आरोप माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com