‘शिवतीर्था’वर एकीचा, भावनांचा महाउत्सव
‘शिवतीर्था’वर एकीचा, भावनांचा महाउत्सव
२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; ढोल-ताशांच्या गजरात परिसर भारावला
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ढोल-ताशांचा गजर, घोषणांचा निनाद आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शिवाजी पार्क परिसरात चैतन्य पसरले होते. शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या संयुक्त प्रचारसभेसाठी ढोल-ताशांच्या तालावर नाचत, वाजतगाजत, घोषणा देत हजारो शिवसैनिक आणि मनसैनिक शिवतीर्थाकडे (शिवाजी पार्क) दुपारपासून जमायला सुरुवात झाली. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यामुळे ही सभा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता कार्यकर्त्यांच्या भावनांचे आणि एकजुटीचे प्रदर्शन ठरल्याचे चित्र होते.
मुंबई पालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या ‘शिवतीर्था’वरील संयुक्त प्रचारसभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुपारी ४ वाजतापासूनच शिवाजी पार्क परिसराकडे कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. मुंबई शहर, उपनगरांतून शिवसैनिक, मनसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या कार्यकर्त्यांच्या जत्थेच्या जत्थे मैदानात दाखल होत होते. हातात झेंडे, तोंडी घोषणा आणि चेहऱ्यावर उत्साह घेऊन कार्यकर्ते मैदानात प्रवेश करीत होते. या संयुक्त सभेत सर्व समाजघटकांचा सहभाग लक्षणीय होता. मराठी माणसासह मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती दिसून आली. दोन दशकांनंतर ‘शिवतीर्था’वर दोन ठाकरे बंधूंना भाषण करतानाचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी सर्वांची धडपड दिसून आली. कार्यकर्त्यांच्या या गर्दीमुळे शिवतीर्थ परिसर अक्षरशः फुलून गेला होता.
----
आज बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. ज्या शिवाजी पार्कवर उद्धव आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या सभांमध्ये एकत्र असायचे. आज ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. हा क्षण आमच्यासाठी दिवाळी-दसऱ्यासारखा आहे.
- सचिन कासार, घाटकोपर, शिवसैनिक
..........
मनसे आणि शिवसेना युतीमुळे दोन भावांचे एकत्र येणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचे आहे. या पवित्र मैदानावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचे पाहून माझे डोळे पाणावले.
- मिलिंद शांताराम राणे, मनसे
.......
या सभेसाठी माझ्यासोबत १५ ते २० मुस्लिम बांधव आले आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रासाठी जे काम केले, ते कोणी केले नाही. पालिकेवर भगवा फडकेल, असा मला विश्वास आहे.
- ताजुद्दीन सैयद देसाई, अंधेरी
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

