विकासाच्या दाव्यांत उमेदवारांची कोंडी
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीला आता अवघे तीन दिवस उरले असताना शहरातील खस्ताहाल रस्ते हेच उमेदवारांसाठी सर्वांत मोठे आव्हान ठरत आहेत. प्रचारासाठी मतदारांच्या दारात जाणारे उमेदवार आज विकासाची आश्वासने देताना अडखळताना दिसत आहे. उखडलेले रस्ते, सुरू असलेली खोदकामे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे मतदारांचा संताप उघडपणे व्यक्त होत आहे. शहराची दयनीय अवस्था पाहता अनेक उमेदवारांना आता मत मागताना संकोच वाटू लागल्याचे चित्र आहे.
शहरातील जवळपास प्रत्येक प्रमुख रस्ता सध्या खोदकामाच्या विळख्यात अडकलेला आहे. चांगल्या-वाईट अशा सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, याचा फटका प्रामुख्याने सत्ताधारी पक्षातील जुन्या नेत्यांना बसत आहे. दुसरीकडे, नव्या आणि तरुण उमेदवारांनी मात्र याच मुद्द्याला प्रचाराचा मुख्य अजेंडा बनवला आहे. सध्या उमेदवारांना प्रचारात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. येथील रस्त्यांवरील खोदकामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भुयारी गटार योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या वाहिनीचे काम पुढील पाच वर्षे सुरू राहणार असल्याने शहराचे विद्रूपीकरण वाढल्याची भावना आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले असताना उमेदवार धक्के खात प्रचार करत आहेत. मतदारांमध्ये अशी चर्चा आहे की आज उमेदवार धक्के खात आहेत; पण जिंकल्यावर पुढील पाच वर्षे जनता धक्के खाणार नाही ना? हा खरा प्रश्न आहे.
गावात रस्ते; शहरात खोदकाम
विकास नगरात राहतो; पण सुविधा गावाहूनही कमी, अशी भावना ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की बाहेरून येणारे नागरिकही उल्हासनगरच्या कारभारावर टीका करत आहेत. ‘गावातही आता रस्ते होत आहेत; पण इथे बनवलेले रस्ते पुन्हा खोदले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः केबी रोडवर एकावर एक सीसी रस्ते टाकल्याने सतत वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.
आश्वासनांवर अविश्वास
प्रचार करणारे उमेदवार ‘जिंकलो की सर्व रस्ते चकाचक करू’, ‘वार्ड स्वर्गासारखा बनवू’ अशी आश्वासने देताना दिसत आहेत. मात्र, या आश्वासनांवर मतदार आता विश्वास ठेवायला तयार नाहीत. मतदार सुज्ञ झाले असून, कोणाला मत द्यायचे आणि कोणाला धडा शिकवायचा हे त्यांनी मनोमन ठरवल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

