पालघरच्या रस्त्यांलगत हरित विकासाची पायाभरणी

पालघरच्या रस्त्यांलगत हरित विकासाची पायाभरणी

Published on

हरित पालघरची पायाभरणी
रस्त्यांलगत बांधकाम विभागाकडून वृक्षलागवड
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १२ ः पालघर तालुक्यातील २७ रस्ते लवकरच हिरवळीने नटणार आहेत. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा व्यापक वृक्षलागवड मोहीम हाती घण्याते येणार आहे. या मोहिमेमुळे रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मोठी मदत होणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत १३०० पेक्षा जास्त वृक्षारोपण करून त्यांचे तीन वर्षासाठी संगोपन केले जाणार आहे.
हरित उपक्रमांतर्गत तालुक्यातील राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि अंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. स्थानिक हवामानाला अनुरूप, दीर्घायुषी व सावली देणाऱ्या वृक्षांची निवड यासाठी करण्यात आली आहे. वाढते तापमान, हवामान बदल आणि विकासकामांमुळे होणारी वृक्षतोड लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे.
वृक्षलागवडीमुळे रस्त्यालगतच्या मातीची धूप रोखली जाणार असून धूळ व प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच प्रवाशांना उन्हापासून दिलासा आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या वृक्षलागवड मोहिमेमुळे पालघर तालुक्यातील रस्ते केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर पर्यावरणपूरक विकासाचे उत्तम उदाहरण ठरणार असून ‘हरित पालघर’ या संकल्पनेला बळ मिळणार आहे.

एकूण रस्ते : २७
एकूण झाडे : १३५५
एकूण खर्च : ७१,१३,७५०

तीन वर्ष संगोपन करणार
रस्त्यांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वृक्षारोपण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या रोपांचे पुढील तीन वर्षांचे संगोपन आणि संरक्षण करण्यावरही भर देण्यात येणार आहे. नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि आवश्यक तेथे संरक्षक कुंपण उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

‘या’ रस्त्यांवर होणार वृक्षलागवड
पालघर तालुक्यातील सातपाटी रस्ता, बोईसर नांदगाव, शिरगाव ते माकणे, हरणवाडी ते नवघर, परनाळी ते जिल्हा मुख्यालय, कुंभवली ते सागावे, वाळवे ते वेवूर, झाई बोर्डी रेवस रेड्डी रस्ता, तारापूर गाव ते किल्ला, पाच मार्ग ते अकरपट्टी, परळी ते कोळगाव, महागाव ते दादळे, पारगाव ते दहिसर, केळवा ते केळवा दांडा, पारगाव फाटा ते दार्शेत, ढेकाळे ते आंबोडे, आगरवाडी ते दातीवरे, सफाळे टेंभी खोडावे केळवा ते कांद्रे भुरे, पालघर शासकीय विश्रामगृह, बोरांडे ते तलासरी, कोकणेर ते पेणंद, पोळे सुतार पाडा ते सावरखंड, नानिवली पेठ घोळ चिंचाळे दहिसर बेळगाव ते सावरे, शासकीय विश्रामगृह मनोर अशा महत्त्वाच्या रस्त्यांसह इतर रस्त्यांवरही वृक्षारोपण केले जाणार आहे. या रस्त्यांची लांबी १०० ते २०० किलोमीटर पेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com