शहरात पोलिसांचे सुरक्षा कवच
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस उरले असताना, शहरातील प्रत्येक मतदान केंद्र, चौक आणि संवेदनशील प्रभागांवर कडेकोट पोलिस पहारा उभारण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मतदार निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावू शकावेत, यासाठी पोलिस प्रशासनाने अभेद्य सुरक्षा नियोजन अमलात आणले आहे. निवडणूक दिवशी उल्हासनगरचे पोलिस छावणीत रूपांतरित होणार आहे.
उल्हासनगर ४चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी २२० पोलिस अधिकारी, १०२५ पोलिस कर्मचारी आणि १०५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य राखीव पोलिस दलाचे दोन पथके शहरात दाखल झाली आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भक्कम फळी कार्यरत राहणार आहे. बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त पोलिस आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त आणि २५ निरीक्षक उपलब्ध आहेत. हे अधिकारी मतदान केंद्रांपासून प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वादग्रस्त प्रभागांपर्यंत सतत लक्ष ठेवणार आहेत.
मतदानाच्या दिवशी शहरात पायदळ गस्त, वाहनांद्वारे पेट्रोलिंग, तसेच अचानक तपासण्या वाढविण्यात येणार आहेत. कोणतीही अफवा, वादग्रस्त पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृतींवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शांततामय, पारदर्शक आणि निर्भय मतदान हीच प्रशासनाची प्राथमिकता असून, उल्हासनगरमध्ये यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत काटेकोर पोलिस बंदोबस्तात पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणूक शांततामय, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, हा प्रमुख उद्देश आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला असून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष असणार आहे. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही. अफवा, दहशत निर्माण करणारे किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, विभाग ४
निवडणुकीसाठी सज्ज
२२० पोलिस अधिकारी
१०२५ पोलिस कर्मचारी
१०५० होमगार्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

