रस्त्याच्या कामाने मनस्ताप
रस्त्याच्या कामाने मनस्ताप
सिमेंटचे पाइप दोन वर्षांपासून शेतकऱ्याच्या शेतात
तलासरी, ता. १३ (बातमीदार)ः ग्रामीण भागातील रस्त्यांची दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यातील सूत्रकार ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र, गोवरशेत पाडा परिसरात काम रखडल असून, एका शेतकऱ्याच्या शेतात दोन वर्षांपासून सिमेंटचे पाइप ठेवण्यात आले आहेत.
सूत्रकार-पाटीलपाडा गोडाऊन ते गोवरशेत पाडा रस्त्याचे कामही अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांची शेती अडली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने सूत्रकार-गोवरशेत पाडातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास होत असून, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतमाल वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.
-----------------------------
शेतकरी, ठेकेदारांमध्ये वाद
पाइप असल्यामुळे नांगरणी व पेरणी करणे शक्य नसल्याने शेतीचा हंगाम वाया गेला आहे. ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या संमतीनेच सिमेंटचे पाइप ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हा दावा फेटाळून लावत, आम्हाला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी, ठेकेदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
------------------------------
निधीअभावी काम रखडले
कार्यकारी अभियंता अधिकारी एस. गांधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काम रखडण्यामागे निधीचा प्रश्न होता. ठेकेदाराला वेळेत देयके मिळाल्याने काम थांबले होते. मात्र, सध्या काँक्रीटचा भाग सुरू करण्यात आला असून, ८ ते १५ दिवसांत मोऱ्यांचे कामही सुरू केले जाईल. शेतकऱ्यांच्या आक्षेपाबाबत ठेकेदाराला तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---------------------------------
आम्ही वर्षातून एकदाच शेती करतो. मात्र, ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय शेतात सिमेंटचे पाइप टाकले. दोन वर्षे उलटूनही साहित्य हटवले नाही. त्यामुळे शेतीचा हंगाम वाया गेला आहे.
-अभिषेक रांधे, शेतकरी

