शहापुरात सिकलसेलची धोक्याची घंटा

शहापुरात सिकलसेलची धोक्याची घंटा

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १३ : सिकलसेल ॲनिमिया आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र, त्या आधीच शहापूर तालुक्यात सिकलसेल ॲनिमियाची गंभीर स्थिती समोर आली आहे. तालुक्यात तब्बल ८५० रुग्णांना सिकलसेल ॲनिमिया आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर ४८ रुग्ण तीव्र सिकलसेल ॲनिमियाग्रस्त म्हणून नोंदविले आहेत. त्यामुळे सध्या शहापूर तालुक्यात एकूण ८९८ रुग्ण या आजाराशी झुंज देत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चार वर्षांत तालुक्यातील पाच तीव्र सिकलसेल ॲनिमियाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सिकलसेल ॲनिमियाच्या निर्मूलनाचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर घटकांच्या तुलनेत आदिवासी समाजात सिकलसेल ॲनिमियाचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत अद्याप पुरेशा आरोग्य सुविधा पोहोचत नसल्याची ओरड सुरू असतानाच, सिकलसेल ॲनिमियाग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हा आजार आणखी बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेची नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार शहापूर तालुक्यासाठी अत्यंत चिंताजनक ठरत आहे.

मागील काही वर्षांत सिकलसेल ॲनिमियावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध उपाययोजना राबविल्या असल्या, तरी अपेक्षित अटकाव बसण्याऐवजी या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः पुढील पिढीत या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक तपासणी, जनजागृती आणि प्रभावी उपचार यांची नितांत गरज निर्माण झाली असून, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


केंद्रनिहाय सिकलसेलची आकडेवारी
प्राथमिक आरोग्य केंद्र तीव्र रुग्ण रोगवाहक
अघई ८ २२२
डोळखांब ४ २१
कसारा ० ५७
किन्हवली १० ६८
शेंद्रूण ७ १०१
शेणवे १ ८८
टेंबे २ ७२
टाकीपठार ७ ५१
वासिंद ९ १७०

२०४७ पर्यंत समूळ उच्चाटनाचे ध्येय
सिकलसेल अ‍ॅनिमिया हा एक गंभीर आणि अनुवंशिक रक्तविकार असून या आजारामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून कोयत्यासारखा होतो. परिणामी, रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन रुग्णांना तीव्र वेदना, संसर्ग आणि जीवघेण्या गुंतागुंतींचा सामना करावा लागतो. केंद्र सरकारने २०४७ पर्यंत सिकलसेल अ‍ॅनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

अभियानात नागरिकांची होणार तपासणी
अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत शहापूर तालुक्यातील वासिंद, शेंद्रूण, किन्हवली, टाकीपठार, शेणवे, डोळखांब, कसारा, टेंबे आणि अघई या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीत ० ते ४० वर्षे वयोगटातील सुमारे १ लाख ५० हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत सोल्यूबिलिटी टेस्ट तसेच निश्चित निदानासाठी एचपीएलसी तपासणी केली जाणार आहे.

समुपदेशनावर भर
सिकलसेलग्रस्त रुग्णांना हायड्रॉक्सीयुरिया, फॉलिक ॲसिड ही औषधे मोफत आणि आवश्यकतेनुसार रक्त संक्रमणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र सिकलसेलग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अर्थसहाय्य मिळवून देण्यात येणार आहे. तसेच, विवाहपूर्व आणि प्रसूतिपूर्व समुपदेशनावर विशेष भर देऊन सिकलसेलग्रस्त बालकांचा जन्म टाळण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com