ग्रामविकासात एकोपा महत्त्वाचा
ग्रामविकासात एकोपा महत्त्वाचा
हमरापूर येथे अभिनेते भाऊ कदम यांचे प्रतिपादन
वाडा, ता. १३ (बातमीदार)ः ग्रामविकासात केवळ निधी नाहीतर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो. गावात एकोपा राहिल्यास विकासाची कामे वेगाने होऊन आदर्श गाव बनेल, असे मत विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी हमरापूर येथे केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विनोदी अभिनेते भाऊ कदम यांची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून राज्य शासनाने निवड केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून भाऊ कदम यांनी तालुक्यातील हमरापूर गावाला भेट देऊन पाहणी केली. भाऊ कदम यांच्या हस्ते पिण्याचे शुद्ध पाणी, महिला व ज्येष्ठांसाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिम तसेच वृक्षलागवड करण्यात आले. तर नदीवर बांधलेला बंधारा, ग्रामपंचायत कार्यालय, बचत गटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलची पाहणी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. तसेच डिजिटल ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य आदी मिळणाऱ्या सोयीसुविधा पाहता हमरापूर गाव निश्चितच बक्षिसास पात्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, वाड्याचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे, हमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अवनी सांबरे, विविध खात्याचे खातेप्रमुख उपसरपंच सदस्य ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------
नृत्यावर धरला ठेका
हमरापूर गावातील महिलांनी सादर केलेल्या तारपा नृत्यात ठेका धरताना भाऊ कदम यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर विनोदी किस्से ऐकवून विद्यार्थी, महिलांचे मनोरंजन केले. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गोधडी भेट म्हणून देण्यात आली.

