

आंबेत एस. टी. स्थानक बनले समस्यांचे आगार
माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील स्थानक उपेक्षित
श्रीवर्धन, ता. १३ (बातमीदार) : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. ए. आर. अंतुले यांची जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या आंबेत गावातील एसटी बस स्थानक सध्या विविध समस्यांनी ग्रासले असून ते प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या स्थानकात स्वच्छतेचा अभाव, मूलभूत सुविधांची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता ठळकपणे दिसून येत आहे. राज्याला नेतृत्व देणाऱ्या गावातच एसटी स्थानकाची अशी दयनीय अवस्था असल्याने प्रवासी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंबेत एसटी स्थानकात प्रवेश करताच रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, तंबाखू व गुटख्याने रंगविलेल्या भिंती, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसणे, स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी आणि उन्हाळ्यात बंद असलेले पंखे अशी विदारक स्थिती पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. सुट्ट्यांचा काळ असल्याने मुंबई, मंडणगड, खेड, महाड, दापोली आदी कोकणातील विविध ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्थानकातील सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेषतः महिलांसाठी असलेली स्वच्छतागृहे मोडकळीस आली असून अस्वच्छ आहेत. दुर्गंधीमुळे महिलांना नाईलाजाने त्याच अवस्थेत स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. अनेक वर्षांपासून स्थानकातील कॅन्टीन बंद असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आंबेत स्थानकातून दररोज सुमारे ५६ नियमित व जादा एसटी बसेसची ये-जा होते. राज्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर महिलांसाठी बाळाच्या स्तनपानासाठी ‘हिरकणी कक्षा’ उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाही, आंबेत स्थानकात अशी सुविधा अद्याप उपलब्ध नाही, हे विशेष खेदजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
...........
आरक्षणप्रणातील दुर्लक्ष
ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेतही आंबेत स्थानकाकडे दुर्लक्ष झाले आहे. मंडणगड, महाड आणि दापोली येथून आंबेत मार्गे जाणाऱ्या अनेक बसेस असतानाही, ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीत आंबेत हा थांबा दाखवला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, या बाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानकात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच वाहतूक नियंत्रक उपस्थित असतो. त्याच वेळेत बसेस नोंदीसाठी स्थानकात येतात. मात्र उर्वरित वेळेत, विशेषतः रात्रीच्या सुमारास, एसटी बसेस स्थानकाच्या आत न येता बाहेरच थांबत असल्याने प्रवाशांना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
.................
आंबेत एस. टी. स्थानकातील प्रमुख समस्या
स्वच्छतेचा पूर्ण अभाव व दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे
पिण्याच्या पाण्याची व कॅन्टीनची सोय नाही
उन्हाळ्यात पंखे बंद, बसण्यासाठी अपुरी व्यवस्था
ऑनलाईन आरक्षण प्रणालीत आंबेत थांबा उपलब्ध नाही
‘हिरकणी कक्षा’सारख्या महिलांसाठीच्या सुविधांचा अभाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.