‘पैशांच्या बॅग’ अफवेने राजकीय खळबळ

‘पैशांच्या बॅग’ अफवेने राजकीय खळबळ

Published on

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : वाशी सेक्टर ९ येथील नूर मशीद परिसरात उभ्या असलेल्या दोन कारमध्ये पैशांनी भरलेली बॅग असल्याची अफवा पसरताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही क्षणांतच ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या चर्चेनंतर शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाशी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे काही वेळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र, तपासानंतर काहीही न सापडल्याने नागरिकांसह यंत्रणेने हुश्शा सोडला.

पोलिस ठाण्याच्या परिसरात घोषणाबाजी, चर्चा आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. या गदारोळात माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक किशोर पाटकर व अविनाश लाड यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. एवढ्यावरच न थांबता, खासदार नरेश मस्के यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिल्याने या प्रकरणाला राजकीय रंग अधिकच चढला. मात्र, एवढ्या मोठ्या गदारोळानंतर पोलिस तपासात कोणत्याही कारमधून पैशांचे घबाड आढळून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. पैशांचे घबाड न सापडूनही पोलिसांची लगबग, मोठ्या नेत्यांची उपस्थिती आणि वाढलेला तणाव यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागे विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत.

नागरिकांचे प्रश्न
जर गाडीत काहीच नव्हते, तर एवढी राजकीय धावपळ कशासाठी, एक साधी अफवा मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते व पोलिस यंत्रणेला हलवू कशी शकते, खासदारांना स्वतः घटनास्थळी येण्याची गरज का भासली, या गोंधळामागे खरोखरच काही वेगळे कारण दडले आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com