मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकांची धामधूम अखेर थांबणार आहे. नवी मुंबई आणि पनवेल या दोन महापालिकांसाठी उद्या (ता. १५) मतदान होणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. हे मतदानाचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे राहणार आहे.
नवी मुंबई महापालिकेत १११ जागांसाठी, तर पनवेल महापालिकेत ७१ जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेकरिता दोन्ही महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान होणार आहे. सर्वाधिक मतदान केंद्रे नवी मुंबई शहरात असल्याने महापालिकेवर अधिक ताण आहे, तर क्षेत्रफळनिहाय पनवेल परिसरही तेवढाच मोठा असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ होणार आहे.
मागील महापालिका निवडणुकीत मतदानाचे फारसे समाधानकारक चित्र दिसून आले नव्हते. २२ एप्रिल २०१५ला झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ऐरोली व बेलापूर विभागांसह शहरात केवळ ४८.३५ टक्के मतदान झाले होते. वाढते शहरीकरण, नोकरीधंद्यातील व्यग्रता, तसेच राजकीय प्रक्रियेबाबतच्या उदासीनतेमुळे मतदानाचा टक्का कमी राहिल्याचे त्या वेळी स्पष्ट झाले होते; मात्र आता मतदानाची आकडेवारी २०१५च्या तुलनेत वाढवण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम केले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील वाढलेल्या मतदानाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आणि महापालिकेच्या व्यापक जनजागृती मोहिमेमुळे यंदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. उद्या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद किती मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
असे आहे नियोजन...
- सर्व मतदान यंत्रे सीलबंद करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.
- सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज असून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षामार्फत बारकाईने लक्ष राहणार आहे.
- प्रत्येक विभागामध्ये एक महिला स्पेशल-सखी मतदान केंद्र (पिंक बूथ), तसेच पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) स्थापित करण्यात येत आहेत.
पनवेलमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था
पनवेल निवडणुकीसाठी सहा विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरिता एकूण ६५६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून मदतीसाठी स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. मतदान केंद्रावर कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण ४,१२५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान यंत्रे तपासणी पूर्ण
निवडणुकीसाठी ८९७ अधिक कंट्रोल युनिट व १,९१२ बॅलेट युनिट प्राप्त झाली आहे. सर्व मतदान यंत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतील सहा स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
निवडणुकीची पद्धत बदललेली आहे. नवमतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निश्चितपणे मतदान वाढेल. सुमारे ८०० ते ८५० मतदारसंख्या असणारे एक मतदान केंद्र असणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हाच आकडा १,२०० असतो. पथनाट्य, मतदानाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी जनजागृती, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, महिलांमध्ये जनजागृती केली आहे.
- डॉ. कैलास शिंदे,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मतदार
नवी मुंबई ९,४८,४६०
पनवेल ५,५४,५७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

