लोकशाहीचा उत्सव फिका
उल्हासनगरात मतदान प्रक्रियेचा बोजवारा
राडा, लाठीचार्ज, ईव्हीएम बिघाडाचा फटका
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या मतदानाला हिंसक वळण आणि प्रशासकीय गोंधळाची किनार लाभली. मध्यरात्री झालेला लाठीचार्ज, सकाळी ईव्हीएममध्ये झालेले बिघाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि केंद्रांवरील सुविधांच्या अभावामुळे मतदारांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. या सर्व गोंधळाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असून, पहिल्या दोन तासांत शहरात अवघे १.९८ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या आदल्या रात्री कॅम्प क्रमांक २ परिसरात दोन गट आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेची दहशत अनेक प्रभागांमध्ये जाणवत होती, ज्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडण्यास कचरत असल्याचे चित्र होते. प्रभाग २० (कॅम्प ५) मध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सकाळपासून ईव्हीएम बंद पडल्याने मतदान ठप्प झाले. संतापलेले ३२ मतदार मतदान न करताच घरी परतले. प्रभाग १७ येथेही अर्धा तास मशीन बंद राहिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार भरत गंगोत्री यांनी निवडणूक यंत्रणेवर तीव्र आक्षेप घेतला, तर प्रभाग १३ आणि १८ मध्ये मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले, ज्यामुळे ‘बोगस मतदाना’ची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय नियोजनाचा फज्जा
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी असलेल्या व्हीलचेअर्स तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रशासनाचा अकार्यक्षम कारभार उघड झाला. महापालिकेच्या वेबसाईटवरील यादी आणि प्रत्यक्ष केंद्रावरील यादी यात तफावत असल्याने मतदारांना केंद्रा-केंद्रांवर वणवण करावी लागली.
राजकीय नेत्यांची धावपळ
मतदान केंद्रावर भाजप उमेदवार अमर लुंड आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी त्यांना केंद्रापासून दूर जाण्यास भाग पाडले. भाजप आमदार कुमार आयलानी यांनी दुचाकीवरून शहरात फेरफटका मारत परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणूक यंत्रणेने वेळेत सुविधा पुरवल्या असत्या, तर मतदानाचा टक्का वाढला असता. तुटलेल्या व्हीलचेअर आणि गायब असलेली नावे हे लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व उमेदवारांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

