ठाण्यात सकाळी मतदानाचा उत्साह

ठाण्यात सकाळी मतदानाचा उत्साह

Published on

ठाण्यात सकाळी मतदानाचा उत्साह
काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा

ठाणे, ता. १५ : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) सकाळी मतदारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. मॉर्निंग वॉक संपवून थेट मतदान केंद्रावर पोहोचणाऱ्या नागरिकांमुळे केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या; मात्र शहरातील अनेक भागांत ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आणि चक्क मशीनला ‘शॉक’ लागण्याचे प्रकार घडल्याने मतदारांना तासनतास ताटकळत राहावे लागले. यामुळे काही ठिकाणी संताप व्यक्त झाला, तर काही मतदार मतदान न करताच माघारी फिरले. ठाणे शहर, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिक नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. घोडबंदर, बाळकुम, कोलशेत, नौपाडा आदी भागांतील काही केंद्रांवर मशीन बंद पडणे, एरर येणे, तसेच काही ठिकाणी मशीनला शॉक लागत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे मतदारांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.

प्रभाग तीन सेंट झेवियर्स शाळेत एका यंत्रात तांत्रिक अडचण होती, तर दुसऱ्या यंत्रातून चक्क ‘विद्युत प्रवाह’ (शॉक) जाणवत असल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले. नौपाडा येथे सरस्वती विद्यालयात मशीन बिघाडामुळे मतदान प्रक्रिया तब्बल दीड तास खोळंबली. मनसे नेते अविनाश जाधव यांनाही या विलंबाचा फटका बसला. कोलशेत व बाळकुम येथील लोढा कॉम्प्लेक्स, यशस्वीनगर आणि कोलशेत खालचा गाव शाळा येथे दीड तास उशिराने मतदान सुरू झाले. प्रभाग १४ मध्ये आर. जे. ठाकूर शाळेत दोन यंत्रे बंद पडल्याने एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. ९ प्रभागांसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये होती. सकाळच्या सत्रात केंद्राबाहेर आणि राजकीय पक्षांच्या मदत केंद्रांवर (बूथ) मोठी गर्दी दिसून आली; मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बोगस मतदानाचा प्रकार
काजूवाडी परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला. एका मतदाराने केंद्रावर गेल्यावर त्याच्या नावाने आधीच मतदान झाल्याचे आढळले, ज्यामुळे बोगस मतदानाच्या शक्यतेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

‘आरोग्य राखा आणि मतदान करा’चा संदेश
घोडबंदर रोड, कळवा, मुंब्रा आणि नौपाडा परिसरातील नागरिक पहाटे फिरायला बाहेर पडले असतानाच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘आधी मतदान, मग इतर कामे’ असा पवित्रा घेत ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी आरोग्यासोबतच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले.

बूथवरही सकाळपासून गर्दी
अनेक सोसायट्यांबाहेर विविध राजकीय पक्षांच्या वतीने मतदार सहाय्य बूथ उभारण्यात आले होते. येथे छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना पावत्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या बूथवरही सकाळपासून गर्दी दिसून आली; मात्र दुपारनंतर मतदानाचा ओघ ओसरल्याचे दिसून आले.

आकडेवारी
एकूण मतदार : १६,४९,८६९
पुरुष : ८.६३ लाख
महिला : ७.८५ लाख
इतर : १५९
निवडणूक रिंगणात : ६४९ उमेदवार

Marathi News Esakal
www.esakal.com