बाधित शेतकऱ्यांसाठी मोबदल्याची मागणी
बाधित शेतकऱ्यांसाठी मोबदल्याची मागणी
पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण व रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरून जाणाऱ्या २२० के. व्ही. नागोठणे एस. पी. सी. एल. वाहिनीच्या कंडक्टर बदल कामासह ४०० के. व्ही. विद्युतपुरवठा वाहिनीच्या कामामुळे बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
रोहा तालुक्यातील कानसई ते पेण तालुक्यातील कासरूघुंटवाडी-निगडे परिसरातील शेतकऱ्यांची बैठक ८ जानेवारी रोजी रायगड भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे झाली. उपजिल्हाधिकारी यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मनोरे उभारणी व उच्चदाब वाहिनीचे काम सुरू करू नये, तसेच बाधित जमिनीचा सर्व्हे करून ले-आऊट जाहीर करून शेतकऱ्यांना नोटिसा देण्याचे आदेश दिले होते.
तथापि, सदर आदेशांकडे दुर्लक्ष करून महापारेषणने यंत्रसामग्री वापरून काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे बाधित जमिनीचा मोबदला तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

