निवडणुकीचे नियोजन ढिसाळ

निवडणुकीचे नियोजन ढिसाळ

Published on

निवडणुकीचे नियोजन ढिसाळ
पालिकेच्या अनियंत्रित कारभाराचे दर्शन
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : तब्बल नऊ वर्षांनंतर पालिकेची निवडणूक पार पडली; मात्र ही निवडणूक गाजली ती निवडणूक नियोजनाच्या ढिसाळ कारभाराराने. मतदार याद्यांचा गोंधळ, मतदानाची टक्केवारी तसेच मतदान मोजणीत झालेली दिरंगाई याचा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागला. यंत्रणा, पैसा, मनुष्यवळ या सर्व गोष्टी असूनही पालिकेकडून निवडणुकीचे नियोजन करता आले नाही.
मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुका पालिका प्रशासनाला सुरळीतपणे पार पाडता आल्या असत्या; मात्र साडेचार हजार स्वयंसेवक, १०,२३१ अधिकारी, पैसा आणि मनुष्यबळाची ताकद असूनही पालिकेच्या निवडणूक यंत्रणेचा ढिसाळ कारभार दिसून आला.

ढिसाळ नियोजन
मतदार याद्यांतील गोंधळ मतदानाच्या दिवसापासून उघड झाला. यादीत दुबार नावे असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मृतांची नावे त्यात होती, तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला. उमेदवारांची यादी, प्रतिज्ञापत्रेही वेबसाईटवर दोन-दोन दिवस उशिराने अपलोड केली. निकाल लावण्यासाठी अचानक ‘पाडू’ यंत्र वापरण्याचा आरोपही पालिका प्रशासनावर करण्यात आला.

मतमोजणी थंड गतीने
मतमोजणीच्या दिवशी निकाल अपडेट करण्यासाठी यंत्रणा पालिकेला उभारता आली नाही. मुंबईतील २२७ प्रभागांची २३ ठिकाणी मोजणी करण्यात आली. दरवेळी निवडणुकीनंतर एक ते दीड वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होत असे; मात्र या वेळी दोन प्रभागांची एकावेळी मोजणी करण्याच्या प्रकाराने दोन प्रभाग मोजायलाच अनेक ठिकाणी तीन वाजले. आठ ते नऊ प्रभाग एका ठिकाणी मोजले जात होते. संध्याकाळी उशिरापर्यंत मतमोजणी संपली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांना कोण कधी निवडून आले, हे कळूच शकले नाही.

क्लीन चिट
कुलाबा मतदारसंघातील दोन प्रभागांत विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप लावला. याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. तेथील निवडणूक अधिकाऱ्यावर आरोप लागले; मात्र या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे अहवाल पालिका प्रशासनाने दिले. त्यावरूनही पालिका प्रशासनावर चौफेर टीका झाली.

श्रीमंत पालिका, ढिसाळ नियोजन
- मतदार याद्यांमध्ये घोळ, शाई पुसण्याचा आरोप
- अचानक पाडू यंत्राचा वापर
- उमेदवार आणि प्रतिज्ञापत्रे अपलोड करण्यास उशीर
- मतमोजणी धीम्या गतीने, निकालासाठी यंत्रणा उभारली नाही
- क्लीन चिट देण्याचे आरोप; प्रशासनावर चौफेर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com