विकासकामे, मराठीच्या मुद्द्याला मुंबईकरांचा कौल
विकासकामे, मराठीच्या मुद्द्याला मुंबईकरांचा कौल
स्थानिक प्रश्नांभाेवती फिरली निवडणूक
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा आणि मराठी अस्मिता हे प्रमुख मुद्दे ठरले. मुंबईकरांनी या दोन प्रमुख मुद्द्यांवर आपला कौल दिला. भाजपने कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे टप्पे यांसह मुंबईतील पुनर्विकासाचे मुद्दे मतदारांसमाेर मांडले, तर ठाकरे बंधूंनी मराठी माणूस या मुद्द्यावर निवडणूक लढवली.
रमाबाईनगर, अभ्युदयनगर, अनेक प्रलंबित पुनर्विकासाचे प्रश्न तडीस लावल्यामुळे मराठी माणूस मुंबईत राहतोय, त्यामुळे अप्रत्यक्ष मुंबईचा मराठी टक्का आम्ही राखल्याचा दावा भाजपने या वेळी केला. मुंबई पालिकेच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे भाजपचा विकासाचा अजेंडा बऱ्यापैकी मुंबईकरांच्या गळी उतरल्याचे दिसून येते.
या निवडणुकीत ठाकरे बंधूंना दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे बंधूंनी केवळ मराठी माणसाच्या मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या. त्यांचे यश बघता मराठी माणसाला ठाकरे बंधूंचे अपील भावले असल्याचे दिसून येते. बहुसंख्य मराठी मतदार असलेल्या भागात ठाकरे बंधूंना पाठिंबा मिळाल्याचे निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट हाेते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून उपस्थित केलेल्या अदाणी समूहाबद्दलच्या मुद्द्याची चर्चा खूप झाली; मात्र त्या तुलनेत त्यांच्या पक्षाचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
वादग्रस्त मुद्दे
मुंबईच्या महापौरपदावरून धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपने प्रयत्न केला; मात्र विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकरांनी मतदान केल्याचे मतपेटीतील निकालातून दिसून येत आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा धारावीत बऱ्यापैकी चालल्याचे दिसून आले.
कामे अन् जनसंपर्काचा फायदा
प्रभागाची निवडणूक असल्यामुळे देश किंवा राज्यस्तरीय मुद्दे या निवडणुकीत नव्हते. नगरसेवकांनी केलेली कामे, जनसंपर्क प्रभावी ठरला. गाेवंडी-शिवाजीनगरमध्ये अमली पदार्थाचा मुद्दा मोठा होता. या मुद्द्यावरून जनतेने समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना नाकारून उच्चशिक्षित पार्श्वभूमी असलेल्या एमआयएमच्या उमेदवारांना संधी दिली. अनेक प्रभागांत सग्यासोयऱ्यांना दिलेली उमेदवारी जनतेच्या पचनी पडली नाही. त्यामुळे अनेक मातब्बर उमेदवारांना पराभूत केले.
हे मुद्दे गाजले
कबुतरखाने बंद करण्यावरून गुजरातीबांधव संतप्त होते. तरीही त्यांनी परंपरागत भाजपच्या पाठीशी उभे राहिले तर बहुतांश उत्तर भारतीय मते भाजपकडे वळली. तमिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांच्या विधानामुळे धारावीत भाजपच्या रवी राजा यांचा पराभव झाल्याची चर्चा झाली.
निवडणुकीतील प्रमुख मुद्दे
ठाकरे बंधू
- मराठी अस्मिता, मराठी माणूस
- मुंबईत ‘अदाणी’चे वाढते साम्राज्य
महायुती
- मुंबईतील वेगवान वाहतूक व्यवस्था
- पुनर्विकासामुळे मराठी टक्का वाचवला
- मुंबईचा महापौर खान नको
काँग्रेस
- धारावीतील पुनर्विकासाला विरोध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

