

‘घराणेशाही’ला मतपेटीतून जोरदार चपराक
निष्ठावंतांच्या ‘शांत बंडा’चा दिग्गजांना फटका
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १७ : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी ‘घराणेशाही’ला नाकारले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ प्रस्थापितांच्या नातेवाइकांना तिकिटे वाटल्याने निर्माण झालेला असंतोष मतपेटीतून बाहेर पडला. कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय वलय असूनही मतदारांनी अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे. हे ‘शांत बंड’ शहराच्या राजकीय संस्कृतीतील बदलाचे मोठे संकेत मानले जात आहेत.
तिकीट वाटपात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या घरातील तीन-तीन उमेदवारांना प्राधान्य दिल्याने रोष निर्माण झाला होता. भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवार हेमा पिजनी यांना या लाटेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तसेच सहा कुटुंबांतील प्रत्येकी तीन उमेदवारांना संधी देण्यात आली होती; मात्र मतदारांनी बहुतेकांना नाकारले. निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), ओमी टीम आणि साई पार्टी यांच्यात ३५-३२-११ असे जागावाटप झाले होते. मात्र कौटुंबिक राजकारणामुळे अनेक मातब्बरांचे गणित चुकले.
पैसा, प्रचारापेक्षा निष्ठा वरचढ
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा हेमा पिजनी यांच्या पराभवाची आहे. प्रचंड आर्थिक ताकद आणि जोरदार प्रचार असूनही मतदारांनी घराणेशाहीच्या विरोधात मतदान केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंड न करता मतदानातून आपली नाराजी व्यक्त केल्याने राजकीय विश्लेषकांकडून याला ‘सायलेंट रिव्होल्ट’ म्हटले जात आहे.
राजकीय पक्षांना इशारा
उल्हासनगरचा हा निकाल आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षांना धोक्याची घंटा आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरून केवळ नातेवाइकांना राजकारणात लादण्याच्या प्रवृत्तीला मतदारांनी लगाम घातला आहे. ‘सत्ता आणि संपत्ती असली तरी सामान्य कार्यकर्ता आणि मतदार सर्वोच्च आहे,’ हा संदेश या निकालाने अधोरेखित केला आहे.
नेते / कुटुंब पक्ष निकाल / स्थिती
लुंड कुटुंब (अमर, शेरी, कंचन) भाजप विजयी (पॅनेल १६ व १७ मध्ये वर्चस्व कायम)
धनंजय बोडारे (स्वतः, पत्नी व वहिनी) भाजप तिन्ही उमेदवारांचा पराभव (पॅनेल १५)
विजय पाटील (स्वतः, मुलगा व वहिनी) शिंदे शिवसेना तिघांचाही पराभव (पॅनेल १९ व २०)
राजेंद्रसिंह भुल्लर (पत्नी व मुलगा) शिंदे शिवसेना पत्नी विजयी, मात्र मुलाचा (विक्की) पराभव
राजू जग्यासी (भाऊ व मुलगा) भाजप केवळ रवि जग्यासी विजयी, इतरांना फटका
जमनू पुरसवानी (तीन उमेदवार) टीओके केवळ स्वतःची जागा वाचवण्यात यशस्वी
प्रमोद टाले (स्वतः व मुलगी) - दोघांचाही पराभव (पॅनेल १८)
भगवान भालेराव (स्वतः व पत्नी) - दोघांनाही जागा राखता आली नाही