प्रथम नागरिकाची चर्चा

प्रथम नागरिकाची चर्चा

Published on

प्रथम नागरिकाची चर्चा
आता उत्सुकता महापौरपदाच्या आरक्षणाची
भाईंदर, विरार, ता. १७ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी सोडतीद्वारे कोणते आरक्षण होणार आहे. याबाबत आता औत्सुक्य निर्माण झाले आहे. मंत्रालयात आरक्षणासाठीची सोडत झाल्यानंतरच महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत आठ महापौर झाले आहेत. सहा वेळा महिला महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर दोन वेळा महापौरपद आरक्षित नसताना महिलांना मान मिळाला आहे. काही दिवसांत सोडत काढली जाण्याची अपेक्षा आहे. महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले तर भाजपमध्ये मोठी चुरस असणार आहे. नगरसेवकपदी सलग सहा वेळा निवडून आलेले ध्रुवकिशोर पाटील, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी स्थायी समिती सभापती रवी व्यास यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत; मात्र धक्कादायक तंत्राचा अवलंब करणाऱ्या भाजपकडून नव्या चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरच कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याची उत्सुकता आहे.
-------------------------------------------
निर्णय प्रदेश पातळीवर
निवडणूक प्रचारकाळात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा-भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होईल, असे वादग्रस्त विधान केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यावर सारवासारव करीत महापौरपदाचा निर्णय प्रदेश पातळीवरील पक्षाची निवड समिती घेईल, असा खुलासा केला. त्यामुळे कोणते आरक्षण जाहीर होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
------------------------------------------
वसई-विरारमध्ये रस्सीखेच
वसई-विरार पालिकेवर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. ११५ जागांपैकी ७१ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले.
त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com