राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा,

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा,

Published on

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
मोहिते महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

मोखाडा, ता. १७ ( बातमीदार ) - ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून शेतकरी, ग्रामस्थ व जनावरांना याचा मोठा लाभ होणार आहे.

खोडाळ्यातील मोहिते महाविद्यालयाचे विषेश हिवाळी श्रमसंस्कार शिबिर ७ ते १३ जानेवारी दरम्यान दत्तक गाव कोचाळे येथे पार पडले. या शिबीर कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वाहत्या ओढ्याच्या पात्रात हा वनराई बंधारा उभारला आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चाललेल्या श्रमदानात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दगड, माती, सिमेंटच्या पिशव्या व स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर करून कमी खर्चात हा बंधारा उभारण्यात आला. या शिबिरात कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी तायडे, प्रा. नितेश कोरडा, प्रा. विशाल मथे आदींनी श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांवरती संस्कार करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी उपसरपंच मिलिंद बदादे, हणमंत फसाळे, पुरुषोत्तम शिंगवे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे ग्रामसेवक एस एस धुरंधर, किनिस्ते गावचे सरपंच योगेश दाते, उपसरपंच पंकज दाते आणि ग्रामस्थांनी स्वयंसेवकांच्या या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

चौकट
पथनाट्याद्वारे जनजागृती

या श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांना सवांद कौशल्ये, युवकांचे मानसिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, युवकांची सामाजिक कार्यात भूमिका, पेसा कायदा, आर्थिक साक्षरता, पर्यावरण एक शाश्वत जीवनशैली आणि हस्तकला या विषयांवर विविध व्याख्यात्यांच्या मार्फत व्याख्याने देऊन संस्कार करण्यात आले. तसेच कोचाळे गावात शोषखड्डे, प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची स्वयंसेवकांनी विल्हेवाट लावली. या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि स्वच्छता या विषयांवर पथनाट्ये सादर करून जनजागृती केली.

सामाजिक बांधिलकीचा जाणीव

या उपक्रमामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाईल, वनराई बंधारा बांधलेल्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढेल तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सातत्याने असे उपक्रम राबवत असल्याचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com