खालापुरात पुन्हा ‘परिवर्तन आघाडी’चा प्रयोग

खालापुरात पुन्हा ‘परिवर्तन आघाडी’चा प्रयोग
Published on

खालापुरात पुन्हा ‘परिवर्तन आघाडी’चा प्रयोग
महायुतीसमोर मोठे आव्हान; राजकीय समीकरणांची कसोटी
खालापूर, ता. २१ (बातमीदार) : मुदत संपून तब्बल चौथे वर्ष उजाडल्यानंतर अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असून, या निवडणुकांकडे राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये गेल्या चार वर्षांत बदललेली राज्यातील राजकीय समीकरणे स्पष्टपणे दिसून येणार आहेत. खालापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. यंदा खालापुरात पुन्हा ‘परिवर्तन आघाडी’चा प्रयोग केला जाणार आहे. त्‍यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
खालापूर पंचायत समितीचे सभापतीपद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर खालापूरातील राजकीय हालचाली वेगाने बदलल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची ‘परिवर्तन आघाडी’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कर्जत नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन आघाडीने मिळवलेल्या एकहाती सत्तेनंतर, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीही हा प्रयोग करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नुकताच अधिकृतपणे जाहीर केला. मात्र, कर्जतमध्ये यशस्वी ठरलेला हा प्रयोग खोपोलीत फसल्याने, खालापूरात तो कितपत यशस्वी ठरतो, यावर आगामी सत्तासमीकरण अवलंबून असणार आहे. महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
.....................
जिल्हा परिषद गटनिहाय स्थिती
चौक गट - या गटात भाजपच्या ठोंबरे बंधूंचे प्राबल्य असून त्यांनी सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी अनुसूचित जमाती महिला आरक्षण असून परिवर्तन आघाडीने येथे उमेदवार जाहीर केली आहे. भाजप आणि परिवर्तन आघाडी यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे.
.............
वासांबे गट - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या गटात मजबूत स्थितीत आहे. मागील निवडणुकीत उमा मुंडे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यंदा सर्वसाधारण आरक्षण असून उमा मुंडे यांचे पती संदीप मुंडे इच्छुक आहेत. भाजपकडूनही तुल्यबळ उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असून येथे परिवर्तन आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
.................
सावरोली गट - मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा रनिंग सीट म्हणून सुरेश पाटील दावेदार असून, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनीही इच्छुकता दर्शवली आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. महायुतीकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या कुटुंबातील उमेदवार किंवा आयात उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
.............
आटकर्गाव गट - मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला हा गट सध्या भाजपमध्ये गेलेले माजी सदस्य नरेश पाटील यांच्यामुळे चर्चेत आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असून परिवर्तन आघाडीने श्रद्धा साखरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नरेश पाटील यांच्या कुटुंबातील उमेदवार कमळ की धनुष्यबाण या चिन्हावर लढणार, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.
.................
चौकट : खालापूरचा राजकीय इतिहास
शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या खालापूर तालुक्यात २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीने इतिहास घडवला होता. जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन गट आणि पंचायत समितीच्या आठ पैकी पाच जागा जिंकत, शिवसेनेची पंचवीस वर्षांची मक्तेदारी मोडीत काढण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती, तर समोर बलाढ्य आघाडी होती. यंदा मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे खालापूरची लढत अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com