खालापुरात प्रशासनाची ‘लगीन घाई’

खालापुरात प्रशासनाची ‘लगीन घाई’

Published on

खालापुरात प्रशासनाची ‘लगीन घाई’
जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी १४४ मतदान केंद्रे सज्ज
खालापूर, ता. १७ (बातमीदार) ः चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त लागल्याने खालापूर तालुक्यात प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्हा परिषदचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण यासाठी ही निवडणूक होत असून एकूण १ लाख १० हजार ९८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण तालुक्यात १४४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. खालापूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुका शांततेत झाल्या होत्या. मात्र त्यानंतर घडलेल्या एका हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात अद्याप तणाव आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत असल्याचे चित्र आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा आणि सतत गस्त यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यात पुरुष मतदारांची संख्या ५५,६७६, महिला मतदार ५५,३०३ तर इतर मतदार ३ आहेत. जवळपास समान पुरुष व महिला मतदारसंख्येमुळे निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदान केंद्रांची विभागनिहाय संख्या पाहता, चौक विभागात ३६, वासांबे विभागात ३६, सावरोली विभागात ३८ तर आत्करगाव विभागात ३४ मतदान केंद्रे आहेत. प्रशासनाने सर्व केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा, कर्मचारी नियुक्ती व ईव्हीएम व्यवस्थापन यांची तयारी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............
चौकट : खालापूर तालुक्यातील मतदारसंख्या व गटवार तपशील

१) चौक जिल्हा परिषद गट – एकूण मतदार : २७,३६५
▪ चौक पंचायत समिती गण : पुरुष ६,८७५ | स्त्री ६,८८२ | इतर १ | एकूण १३,७५८
▪ हाळखुर्द पंचायत समिती गण : पुरुष ६,७३२ | स्त्री ६,८७५ | एकूण १३,६०७

२) वासांबे जिल्हा परिषद गट – एकूण मतदार : २८,०७४
▪ रिस गण : पुरुष ७,५६४ | स्त्री ७,११८ | इतर १ | एकूण १४,६८३
▪ वासांबे गण : पुरुष ७,०३९ | स्त्री ६,३५१ | इतर १ | एकूण १३,३९१

३) सावरोली जिल्हा परिषद गट – एकूण मतदार : २८,३४०
▪ वाशिवली गण : पुरुष ६,९९६ | स्त्री ७,१७१ | एकूण १४,१६७
▪ सावरोली गण : पुरुष ६,९१२ | स्त्री ७,२६१ | एकूण १४,१७३

४) आत्करगाव जिल्हा परिषद गट – एकूण मतदार : २७,२०३
▪ खानाव गण : पुरुष ६,७९७ | स्त्री ६,९१३ | एकूण १३,७१०
▪ आत्करगाव गण : पुरुष ६,७६१ | स्त्री ६,७३२ | एकूण १३,४९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com