सत्तेच्या सारिपाटसाठी जोरदार रस्सीखेच
सत्तेच्या सारिपाटासाठी रस्सीखेच
युतीतूनच संघर्षाचा नवा अध्याय
शर्मिला वाळुंज
कल्याण, ता. १७ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, महायुतीने सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे; मात्र ५३ जागा जिंकणारी शिंदेंची शिवसेना आणि ५० जागा जिंकणारी भाजप यांच्यात आता मोठा भाऊ कोण, यावरून खरी रस्सीखेच सुरू झाली आहे. संख्याबळातील अवघ्या तीन जागांच्या फरकामुळे दोन्ही पक्षांनी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांतील मासे गळाला लावण्यासाठी फिल्डिंग लावली असून, महापौरपदावरून युतीत संघर्षाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत.
सत्तेचे गणित जुळवण्यासाठी आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या शीतल मंढारी यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत विजय साजरा केल्याने त्या भाजपला साथ देण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा आहे, तसेच स्वप्नाली केणे आणि अन्य एक नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे समजते.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिष्ठेच्या असलेल्या डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्णायक भूमिका बजावली. विष्णूनगरसारख्या संवेदनशील भागात संघाच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजप उमेदवारांना यश मिळाले. विशेष म्हणजे भाजपने डोंबिवलीतून १४ उमेदवार बिनविरोध निवडून आणत आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे.
मतदारांचा प्रस्थापितांना धक्का
या निवडणुकीत मतदारांनी पक्षांतर करणाऱ्या आणि घराणेशाही जपणाऱ्या जुन्या नगरसेवकांना स्पष्ट नाकारले आहे. तसेच सुशिक्षित चेहऱ्यांना पसंती मिळाली. प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांनी संधी दिली आहे. तर आपणच शहराचे तारणहार आहोत, अशा अविर्भावात वावरणाऱ्या आणि राडेबाजी करणाऱ्या नेत्यांना सुशिक्षित डोंबिवलीकरांनी मतपेटीतून घरी बसवले आहे.
...तर युतीत ठिणगी
महायुतीचा महापौर कोणाचा, हा कळीचा मुद्दा आहे. शिवसेनेने (शिंदे गट) जागावाटपात ६८ जागा लढवून ५३ जागा जिंकल्या, तर भाजपने ५४ पैकी ५० जागा जिंकत आपला स्ट्राइक रेट उत्तम ठेवला आहे. भाजपने अंबरनाथसारखा स्वबळाचा प्रयोग कल्याण-डोंबिवलीत करण्याचा प्रयत्न केल्यास युतीत मोठी ठिणगी पडू शकते; मात्र केडीएमसीत सत्तास्थापनेसाठी आता ससा आणि कासवाचा खेळ सुरू झाला आहे. अपक्षांची साथ आणि पक्षांतर्गत जुळवाजुळव जो वेगाने करेल त्याचाच महापौर खुर्चीवर विराजमान होईल.
पक्षनिहाय बलाबल
शिवसेना शिंदे गट : ५३
भाजप : ५०
शिवसेना ठाकरे गट : ११
मनसे : ५
काँग्रेस : २
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

