ठाणे पालिका निवडणुकीत सव्वा लाख नोटा

ठाणे पालिका निवडणुकीत सव्वा लाख नोटा

Published on

ठाणे पालिका निवडणुकीत ‘नोटा’ सव्वा लाख
६४९ उमेदवारांना मतदारांनी नाकारले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मागील काही वर्षांतील राजकीय फोडाफोडी, पक्षांतरे आणि निष्ठेच्या बदलत्या व्याख्यांमुळे ठाणेकर मतदार संतप्त असल्याचे चित्र महापालिका निवडणूक निकालांतून स्पष्ट झाले आहे. १३१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत चक्क एक लाख २५ हजार (सव्वा लाख) मतदारांनी रिंगणातील ६४९ उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ पर्यायाला पसंती दिली आहे.
२०१७च्या निवडणुकीत ५८.८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानात ३.२ टक्क्यांची घट झाली आहे. ही घसरण आणि ‘नोटा’चा वाढता टक्का राजकीय विश्लेषकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. या वेळी ३३ प्रभागांमध्ये आठ लाख ६३ हजार ८७९ पुरुष, तर सात लाख ८५ हजार ८३१ महिला आणि १५९ इतर असे १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार असून, त्यापैकी चार लाख ८३ हजार ६९८ पुरुष, तर चार लाख ३३ हजार ३८५ महिला आणि ४० इतर अशा नऊ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील वर्षीच्या ५८.८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत ५५.५९ घट झाल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे ठाणेकर मतदारांनीदेखील उमेदवारांना नाकारत मतदानाचा हक्क बजावत ‘नोटा’ला पसंती दिल्याचे दिसून आले.

प्रभाग २ मध्ये सर्वाधिक
ठाणे पालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. मतदानासाठी गेलेल्या मतदारांनी निवडणुकीत उभ्या ठाकलेल्या उमेदवारांना नाकारत नोटाला पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक प्रभाग २ मध्ये सहा हजार ७७ तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक १८ मध्ये ८३४ मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे दिसून आले.

नोटा वाढण्याची कारणे काय?
राजकीय वर्तुळात चर्चा आहे, की मागील काही वर्षांतील उमेदवारांची पळापळ आणि पक्षनिष्ठा या मुद्द्यांवरून सुशिक्षित ठाणेकर नाराज होते. ८ ते १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही निवडणूक झाली, तरीही मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना नाकारून आपला राग व्यक्त केला आहे. सव्वा लाख मते ‘नोटा’ला पडणे, ही आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

प्रभागनिहाय ‘नोटा’ची आकडेवारी
प्रभाग क्र. नोटा मते प्रभाग क्र. नोटा मते प्रभाग क्र. नोटा मते
१ ५,०६२ १२ ३,६१९ २३ ४,७३१
२ ६,०७७ १३ ३,१४४ २४ ४,१५५
३ २,७८३ १४ २,८७७ २५ २,२८१
४ ४,५०५ १५ ३,१०४ २६ ५,६५२
५ ३,१६२ १६ ४,३४५ २७ २,७२५
६ ४,३६४ १७ २,१६४ २८ २,७०५
७ ४,५७० १८ ८३४ २९ १,९१८
८ ४,२३८ १९ ३,९९२ ३० १,३०१
९ ४,३६२ २० ४,१६८ ३१ २,८१७
१० ४,०६० २१ ४,४८९ ३२ ३,९३७
११ ४,०३९ २२ ४,४७५ ३३ १,४३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com