

मुंबई महापालिकेत महिलाराज
१३५ जागांवर विजय; २० खुल्या प्रभागांत पुरुषांना दणका
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई महापालिका २०२६च्या निवडणुकीत महिलांनी निर्णायक भूमिका बजावून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. यंदाच्या निवडणुकीत २२७ पैकी तब्बल १३४ जागांवर महिला उमेदवारांनी विजय मिळवून ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळवले आहे. हे यश आरक्षित जागांपुरते मर्यादित नसून सर्वसाधारण गटातील २० पुरुष उमेदवारांना धूळ चारून पालिकेत महिलाराज सिद्ध केले आहे.
पालिकेतील ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित होते; मात्र त्या व्यतिरिक्तही महिलांनी विविध प्रभागांतून विजय मिळवून महिलाशक्ती दाखवून दिली आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता तसेच महिलांशी संबंधित मुद्द्यांवर प्रचाराचा राेख ठेवल्यामुळे महिला उमेदवारांना त्याचा फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निकालांमुळे आगामी महापालिका कारभारात महिलांचा सहभाग आणि प्रभाव अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला विजयी उमेदवारांच्या संख्येत भाजप आघाडीवर राहिला आहे. भाजपच्या ४८ महिला उमेदवार विजयी झाल्या. प्रभाग १५मधील जिग्नासा निकुंज शाह यांनी २६ हजार ०८८ मते मिळवून सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम केला. प्रभाग १३१मधील राखी जाधव (२१,३४६), प्रभाग १७मधील डॉ. शिल्पा सांगोरे (२०,३९०) आणि प्रभाग २१मधील लीना पटेल देहेरकर (२०,२६७) यांनीही घवघवीत विजय नोंदवला.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) ३९ महिला उमेदवार विजयी झाल्या. श्रद्धा पेडणेकर (प्रभाग २०३, १६,४८७), अबोली खाडये (प्रभाग १९८, १५,६७८) आणि स्वरूपा तुकाराम पाटील (प्रभाग १२७, १५,४७८) यांचा विजय विशेष ठरला. या गटाने शहरी तसेच झोपडपट्टीबहुल प्रभागांत महिलांचा जनाधार टिकवून ठेवल्याचे दिसून आले.
शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) २० महिला विजयी झाल्या असून दीक्षा कारकर (प्रभाग ६, १८,२३५) आणि संध्या दोशी (प्रभाग १८, १५,५६९) यांचा विजय लक्षवेधी ठरला. काँग्रेसच्या १३ महिला, मनसेच्या पाच महिला, तर एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवारांनीही विजय मिळवला आहे. एकूणच २०२६च्या महापालिका निवडणुकीत ‘महिलाच सरस’ ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
......................................
भाजप : ४८
शिवसेना (ठाकरे गट) : ३९
शिवसेना : २०
काँग्रेस : १३
एमआयएम : ४
मनसे : ५
राष्ट्रवादी काॅँग्रेस : ३
समाजवादी पक्ष : २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.