घराणेशाहीला नवी मुंबईकरांची पसंती

घराणेशाहीला नवी मुंबईकरांची पसंती

Published on

विक्रम गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा एक वेगळाच राजकीय ट्रेंड पाहायला मिळाला आहे. शहराच्या राजकारणावर अनेक कुटुंबांनी आपल्या घराणेशाहीची छाप उमटविली आहे. आई-वडील-मुलं, सासरा-सून, काका-पुतणे, भाऊ-भावजया तसेच पती-पत्नी अशा अनेक नातेसंबंधातील उमेदवार एकाचवेळी विजयी झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात घराणेशाहीची सत्ता हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

ऐरोलीतून शिवसेनेचे विजय चौगुले, त्यांची मुलगी चांदणी, मुलगा ममित आणि जावई आकाश मढवी यांनी या निवडणुकीत विजय मिळवत चौगुले कुटुंबाची ताकद अधोरेखित केली. त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर-४मधून हेमांगी सोनवणे आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या या माय-लेकीच्या जोडीनेही मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. तर वाशीमधून शिवसेनेच्या प्रणाली लाड आणि त्यांची मुलगी सोनवी या माय-लेकी विजयी झाल्या असून, तळवली -रबाळेमधून मंदाकिनी म्हात्रे आणि अनिकेत या माय-लेकाच्या जोडीनेही महापालिकेत प्रवेश केला आहे.

सानपाड्यातून भाजपचे दशरथ भगत व निशांत या काका-पुतण्यासह त्यांच्याच कुटुंबातील प्रीती या सुनेनेदेखील विजय प्राप्त केल्यामुळे भगत कुटुंबाची राजकीय ताकद वाढली आहे. तुर्भेमधून शिवसेनेचे सुरेश कुलकर्णी व अबोली कुलकर्णी हे सासरा-सून विजयी झाले आहेत. नेरूळमध्ये माजी महापौर जयवंत सुतार आणि त्यांची भावजय माधुरी जयेंद्र सुतार तसेच काशीनाथ पाटील आणि त्यांची मुलगी प्रणाली यांनी यश मिळवले. तसेच बेलापूरमधून पूनम मिथुन पाटील व अमित हे दीर-भावजय विजयी झाले आहेत.

विशेष म्हणजे नाईक कुटुंबातील सागर नाईक, वैष्णवी, अदिती आणि रेखा म्हात्रे हे चौघेही निवडून आले आहेत. तुर्भ्यातील कै. डी. आर. पाटील यांच्या कुटुंबातील शुभांगी पाटील, शशिकला व कविता यांनीही विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची स्थानिक पातळीवरील कामगिरी, जनसंपर्क आणि प्रभावी नेटवर्क यांच्या जोरावर अनेक कुटुंबांनी एकाचवेळी सत्ताकेंद्रात प्रवेश केला आहे. महापालिकेच्या राजकारणात या कुटुंबांचा निर्णायक प्रभाव यापूर्वीही दिसून आला होता आणि पुढेही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पती-पत्नींच्या चार जोड्या
या निवडणुकीत पती-पत्नीच्या तब्बल चार जोड्या विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये माजी महापौर सुधाकर सोनावणे-रंजना, शिवराम पाटील-अनिता, रविकांत पाटील-भारती, तसेच सूरज पाटील-सुजाता यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com