निवडणुकीसाठी आलेल्या एसटी बसमधील डिझेल चोरीला

निवडणुकीसाठी आलेल्या एसटी बसमधील डिझेल चोरीला

Published on

एसटी बसमधील डिझेलची चोरी
ठाणे, ता. १८ : निवडणूक बंदोबस्तासाठी पोलिसांची ने-आण करण्यासाठी ठाण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसमधून डिझेल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील खारेगाव टोलनाका परिसरात ही चोरी झाली असून, चोरट्यांनी दोन्ही बसमधून एकूण ३०० लिटर डिझेल चोरून नेले आहे. याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील शहादा आगारातून योगेश माळी आणि किरण जावरे हे चालक दोन एसटी बस (एमएच १४ बीटी २१२५ आणि एमएच २० बीएल २३०६) घेऊन निवडणूक कर्तव्यासाठी ठाण्यात आले होते. पोलिसांना मुलुंड ते नंदुरबार घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. १६ जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजता त्यांनी कळवा, खारेगाव टोलनाका येथील पारसिकनगर परिसरात रस्त्याकडेला बसेस पार्क केल्या आणि ते बसमध्येच झोपी गेले. १७ जानेवारीला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास किरण जावरे यांना डिझेलचा तीव्र वास आल्याने जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, चार जण दोन्ही बसच्या टाकीतून डिझेल काढताना दिसले. जावरे यांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी कार आणि दुचाकीवरून पळ काढला. विशेष म्हणजे चोरीसाठी वापरलेल्या या दोन्ही गाड्यांना नंबर प्लेट नव्हती, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. दोन्ही बसमधून प्रत्येकी १५० लिटर डिझेल चोरीला गेले. चोरीला गेलेल्या डिझेलची अंदाजे किंमत २७ हजार रुपये आहे. चालक योगेश माळी यांच्या तक्रारीवरून कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com