सूर्या नदीत बेकायदा मासेमारी
सूर्या नदीत बेकायदा मासेमारी
पाण्यात विषारी रसायने टाकण्याचा प्रकार
कासा, ता. १७ (बातमीदार)ः कासातील सूर्या नदीत मासे मारण्यासाठी विषारी केमिकल टाकल्याने नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकारामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूर्या नदीचे पाणी कासा, वरोती घोळमार्गे पुढे मासवनपर्यंत जाते. या नदीवर जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या विहिरी बांधण्यात आल्या असून, या पाण्याचा वापर अनेक गावांतील नागरिक तसेच गुरे-ढोरे यांना पाजण्यासाठी करतात. नदीकाठावर जनावरे पाणी पित असल्याने विषारी द्रव्यांमुळे मानवासह पशुधनालाही धोका संभवतो. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या वेळी या परिसरात पारंपरिक पद्धतीने मासेमारी होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते विपुल राऊत यांनी सांगितले.
------------------------------------
शनिवारी सकाळी माहिती मिळताच नागरिकांना असे मृत मासे न खाण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कासा ग्रामपंचायतीनेही तातडीने दखल घेतली आहे.
- अमर पाटील, पोलिस निरीक्षक, कासा
-----------------------------
पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणा आणि पोलिस प्रशासन यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. या घटनेमुळे सूर्या नदीतील पाणीपुरवठा, पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- हरीश मुकणे, उपसरपंच

