पहाटेच्या थंडीत बत्ती गुल, प्रवासी आणि विध्यार्थी संभ्रमात...

पहाटेच्या थंडीत बत्ती गुल, प्रवासी आणि विध्यार्थी संभ्रमात...

Published on

दिवस उजाडण्याआधीच पथदिवे बंद
कांदिवली पश्चिमेत विद्यार्थ्यांची गैरसोय

कांदिवली, ता. १७ (बातमीदार) : सध्या थंडीच्या दिवसांत दिवस उशिराने उजडत असतानाही कांदिवली पश्चिम परिसरातील पथदिवे सकाळी लवकर बंद केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कांदिवलीत पश्चिम परिसरात सहा शाळा, दोन महाविद्यालये आणि विधी महाविद्यालय असल्याने येथील मार्गावर सकाळच्या सुमारास शेकडो विद्यार्थी आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची वर्दळ असते. सध्या मुंबईत तापमानाचा पारा घसरलेला असल्याने सकाळी उशिराने उजडत आहे. त्यात रस्त्यावरील पथदिवे लवकर बंद केले जात असल्याने या मार्गांवर सकाळच्या सुमारास अंधुक प्रकाश असतो. त्यामुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांदिवली पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावर बालभारती शाळा आणि एसटी बस थांबा आहे. शांतीलाल मोदी मार्गावर प्रकाश महाविद्यालय, पालिका शाळा आहे. मथुरादास मार्गावरील छेद मार्गावर केईएस महाविद्यालय आणि विधी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद शाळा, पुढे धनामल शाळा आहे. या विद्यार्थ्यांची सकाळच्या सुमारास लक्षणीय संख्या असते. तसेच रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी असते. सकाळच्या सुमारास या मार्गांवरील पथदिवे दिवस उजाडण्यापूर्वी बंद केले जात आहेत. त्यामुळे अंधुक प्रकाशातून विद्यार्थी, प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावरील पथदिवे दिवस उजाडेपर्यंत सुरू ठेवायला हवेत. कांदिवली पश्चिमेत तसे होत नसल्याने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी येथील रहिवासी आशीष पाटील यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com