तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या कामाला तात्पुरती स्थगिती

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या कामाला तात्पुरती स्थगिती

Published on

संरक्षण भिंतीच्या कामाला तात्पुरती स्थगिती
ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
बोईसर, ता. १७ (प्रतिनिधी) ः तारापूर अणुऊर्जा प्रकल्प अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीमुळे घिवली गावाचा मुख्य वहिवाटीचा मार्ग बंद होणार असल्याची बामी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने संरक्षण भिंतीच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पाचमार्ग-घिवली दरम्यानचा जुना सरळ वहिवाटीचा रस्ता बंद करून सात ते आठ किलोमीटरचा पर्यायी मार्ग देण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. वेळ, इंधन व खर्च वाढणार असल्याने नागरिकांनी या मार्गाला विरोध दर्शवला. तरीही संरक्षण भिंतीचे काम सुरु होताच संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे व जिल्हा महिला संघटक वैदेही वाढाण यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. संरक्षण भिंतीमुळे कुरणजमीन, विहिरी बाधित होऊन पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत अरुंद रस्त्यामुळे गाव रिकामे करणे कठीण होईल, अशी गंभीर बाबही बैठकीत मांडण्यात आली. यावर कोणत्याही परिस्थितीत गावाचा वहिवाटीचा मार्ग बंद करता येणार नाही, असे तोंडी स्पष्ट निर्देश देत पुढील निर्णय होईपर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक बाबी तृतीय संस्थेमार्फत तपासण्याचे, कौशल्यपूर्ण कामगारांच्या प्रश्नावर जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत तोडगा काढण्याचे आणि अंतरासंबंधी संभ्रम पुन्हा तपासण्याचे आदेश दिले. अन्य मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, आमदार राजेंद्र गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com