मुंबई महापालिकेत अमराठी चेह-यांचा भरणा

मुंबई महापालिकेत अमराठी चेह-यांचा भरणा

Published on

महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा
तब्बल ७६ जणांचा विजय; भाजपमधून सर्वाधिक ३३ जणांना संधी

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : महापालिकेत यंदाच्या निवडणुकीनंतर अमराठी चेहऱ्यांचा भरणा झाला आहे. पालिकेच्या निवडणूक रिंगणात विजयी ठरलेल्या २२७ नगरसेवकांमध्ये तब्बल ७५ जण अमराठी प्रतिनिधी आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह सर्वच पक्षांचे पाठबळ या प्रतिनिधींना मिळाले असले तरी सर्वाधिक ३३ जण भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी महापौर पदावरून रणकंदन माजले होते. भाजपने मुंबईचा महापौर मराठी-हिंदू असेल, असा दावा केला होता. त्यामुळे मुंबईचा महापौर मराठी, हिंदू की मुस्लिम होणार, यावर चर्चा रंगल्या. त्यातच सर्वच पक्षांनी मराठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवतानाच अमराठी चेहऱ्यांनाही संधी दिली होती. यामध्ये तब्बल ७६ अमराठी उमेदवारांना या निवडणुकीत यश मिळाले. हा आकडा मराठी नगरसेवकांच्या तुलनेत कमी असला तरी तो लक्षणीय आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असून, त्याखालोखाल काँग्रेसचे १८, शिवसेना ठाकरे गटाचे आठ तर शिवसेनेचे चार आहेत.

मराठी अजेंड्याचा परिणाम
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मराठी मुद्दा अजेंड्यावर घेत प्रतिष्ठेचा केल्याने अनेक पक्षांनी मराठी उमेदवारांना तिकीट देण्यावर भर दिला. त्यामुळे अमराठी नगरसेवकांचा आकडा ७६ पर्यंत राहू शकला अन्यथा हा आकडा शंभरी पार गेला असता, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमराठी नगरसेवकांची आकडेवारी
भाजप - ३३
शिवसेना - ४
शिवसेना ठाकरे - ८
काँग्रेस - १८
एमआयएम - ७
एनसीपी - ३
समाजवादी पार्टी - २
मनसे - १

मुंबईबरोबरच मराठी माणसांवर अतिक्रमण होत असल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. महापालिकेत अमराठी चेहरे वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. मराठी माणसाने याचा विचार करायला हवा अन्यथा आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
- गौरव सागवेकर, अध्यक्ष, आम्ही गिरगावकर संघटना

मुंबईत अनेक अमराठी लोक पिढ्यानपिढ्या येथे राहत असून, ते स्वत:ला मुंबईकर समजत असल्याने ते निवडणूक मैदानात उतरणार हे स्वाभाविक आहे. आज मुंबईत गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीयांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांचे प्रतिनिधी वाढणार, हे नाकारता येणार नाही.
- जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com