मुंबईत ‘आप’ निष्प्रभ
मुंबईत ‘आप’ निष्प्रभ
सर्व ६३ उमेदवार पराभूत; एकत्रित २० हजारांवर गारद
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : हरियाना, गोवा अशा राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेल्या आम आदमी पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. तब्बल ६३ उमेदवार रिंगणात उतरवूनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या ६३ उमेदवारांना मिळून अवघी २० हजार ७१७ मते मिळाली. मुंबईसारख्या महानगरात खातेही न उघडता आल्याने पक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
दिल्लीतील सत्तेचा अनुभव आणि ‘पर्यायी राजकारणा’ची ओळख असूनही मुंबईत ‘आप’ला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाची शहरात संघटना असली तरी ती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकली नाही. विशेषतः झोपडपट्टी, कामगारवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीय मतदारांशी पक्षाचा थेट संवाद कमी पडल्याचे दिसून आले.
मोठ्या संख्येने उमेदवार उभे करूनही काही निवडक प्रभागांतच त्यांना मते मिळू शकली. प्रभाग क्रमांक ८०मधून निवडणूक लढवलेल्या ‘आप’च्या उमेदवार तरुणा कुंभार यांना सर्वाधिक चार हजार २१३ मते मिळाली. पक्षाच्या एकूण मतांत त्यांचा वाटा लक्षणीय ठरला. दुसरीकडे काही प्रभागांत पक्षाची कामगिरी अत्यंत तोकडी राहिली. प्रभाग क्रमांक १६८ मधून निवडणूक लढवलेल्या अक्षय सानप यांना अवघी ३५ मते मिळाली. यावरून अनेक ठिकाणी ‘आप’चा प्रचार आणि संपर्क यंत्रणा किती मर्यादित होती, हे स्पष्ट होते.
संघटनाच कमकुवत
मुंबईत ‘आप’ला सर्वसामान्य थरातील कार्यकर्ते जोडण्यात अपयश आले. पक्षाची संघटना मर्यादित वर्तुळात अडकली होती. त्यामुळे बूथस्तरावरील प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापन कमकुवत ठरले. शिवाय पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा इंग्रजी भाषिक, अर्बन एलिट अशी राहिल्याने मराठी भाषिक आणि स्थानिक मतदारांशी भावनिक नाते तयार होऊ शकले नाही.
‘आप’च्या अपयशाची पाच कारणे
- बूथस्तरावर कार्यकर्त्यांची अपुरी संख्या आणि सक्रियता
- स्थानिक भाषा, संस्कृती आणि भावनिक मुद्द्यांशी पक्ष नाते जोडू शकला नाही.
- वाहतूक, झोपडपट्टी पुनर्वसन, पावसाळी समस्या यावर ठोस भूमिका दिसली नाही.
- प्रचार काही निवडक प्रभागांपुरताच सीमित राहिला.
- अनेक प्रभागांत उमेदवारांची स्थानिक ओळख आणि प्रभाव नगण्य ठरला.
----
आत्मपरीक्षणाची गरज
हा निकाल ‘आप’साठी आत्मपरीक्षणाचा स्पष्ट इशारा मानला जात आहे. मुंबईत पाय रोवायचे असतील, तर भक्कम स्थानिक संघटना, मराठी मतदारांशी थेट संवाद आणि मुंबईकेंद्री राजकारण उभे करणे पक्षासाठी अपरिहार्य ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

