बोईसरमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बोईसरमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Published on

बोईसरमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
महावितरणकडून नोटीस देण्याची तयारी

बोईसर, ता. १८ (वार्ताहार) : बोईसर येथील पास्थळ, आत्मशक्ती नगर परिसरातील मॉडर्न इंग्लिश स्कूल शाळेच्या संरक्षण भिंतीमध्येच महावितरणचा लोखंडी विद्युत खांब अडकलेला असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

शाळेच्या मुख्य संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना तेथे आधीपासून असलेल्या लोखंडी विद्युत खांबाचा विचार करण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. सध्या विद्युत खांब आणि भिंत एकमेकांना थेट स्पर्श करत असल्याने, पावसाळ्यात ओलावा वाढल्यास भिंतीतून विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात महावितरणने आपली भूमिका स्पष्ट करत, सदर बाब ही शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीमुळे घडल्याचे सांगितले आहे. तसेच महावितरणने संबंधित शाळा प्रशासनाला नोटीस देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, शाळेला नोटीस देऊन जबाबदारी झटकवण्याऐवजी प्रत्यक्षात तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

चौकट -
अपघाताची भीती व्यक्त

शाळेत दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा वावर असतो. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा पादचाऱ्याचा अनावधानाने भिंतीला स्पर्श झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. विद्युत विभाग व शाळा प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांना बसू नये, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोट

समोरील लोखंडी खांब पूर्वीपासून तिथे होता की नाही, याची खात्रीशीर माहिती नाही. मात्र, या प्रकरणाची माहिती शाळेच्या मालकांना देऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तसेच भिंतीजवळ पडलेले दगड आणि राडारोडा त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या जातील.

- मुख्याध्यापिका, मॉडर्न इंग्लिश स्कूल

कोट

विद्युत खांब, जर भिंतीच्या बांधकामात अडकला असेल, तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अपघाताला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार राहील. आम्ही या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत.


- प्रदीप अर्जुने
सहाय्यक अभियंता, महावितरण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com